भातखळकरांना प्रभारी नेमून आशिष शेलारांचे पंख छाटले  - Ashish Shelar's wings have been cut off by appointing Atul Bhatkhalkar in charge | Politics Marathi News - Sarkarnama

भातखळकरांना प्रभारी नेमून आशिष शेलारांचे पंख छाटले 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

त्यांना 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना मंत्रिपद देण्यात आले होते.

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे मुंबई शहर तसेच मुंबई महापालिकेची खडान्‌खडा महिती असलेले भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार यांना महापालिकेपासून दूर ठेवण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आल्याचे बोलले जात आहे. 

मुंबई महापालिकेत ऍड. आशिष शेलार हे दोन वेळा नगरसेवक राहिले आहेत. या काळात त्यांनी पक्षाचे गटनेते तसेच सुधार समिती अध्यक्षपदही भूषवले आहे. मुंबई पालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष होते. या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांची संख्या 29 वरुन 82 वर पोचली होती. त्यानंतर त्यांना 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना मंत्रिपद देण्यात आले होते. या मंत्रिपदासाठी ते भाजपची सत्ता आल्यापासून वेटिंगवर होते. त्यामुळे फडणवीस आणि शेलार यांच्यात फारसे सख्य नसल्याचे स्पष्ट झाले होते. 

अभ्यासू नगरसेवक ते अभ्यासू आमदार म्हणून आशिष शेलार यांची ओळख आहे. महापालिकेत प्रशासनाला कात्रीत पडकण्यात त्यांचा हातखंडा होता. प्रशासकीय कामाकाजाची जाण तसेच, मुंबईच्या प्रत्येक गल्लीतील समस्येबाबत त्यांना माहिती आहे. त्याचबरोबर शिवसेनेशी थेट भिडण्यातही ते पुढे असतात. असे असतानाही त्यांच्याऐवजी अतुल भातखळकर यांना मुंबई महापालिकेची जबाबदारी दिल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

मुंबईऐवजी ठाण्याची जबाबदारी 

ऍड. आशिष शेलार यांच्याकडे आता ठाणे शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासोबतच राज्याबाहेरील काही शहरांच्या महापालिका निवडणुकांची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे  ठाणे तसेच इतर शहरांमध्ये त्यांना गुंतवून ठेवत मुंबईपासून त्यांना दूर करण्याचा हा डाव आहे का, अशी चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख