मुकेश अंबानींच्या घराबाहेर सचिन वाझेंना तीन वेळा चालायला लावलं... - arrested cop sachin waze made to walk near antilia in scene reconstruction | Politics Marathi News - Sarkarnama

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सचिन वाझेंना तीन वेळा चालायला लावलं...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 मार्च 2021

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सचिन वाझेंना आणले होते. त्यांना कुर्ता घालून चालायला लावलं.

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची सध्या चौकशी सुरु आहे. काल रात्री पावणेअकरा वाजता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर त्यांना आणले होते. त्यांना कुर्ता घालून चालायला लावलं. मुकेश अंबानींचं निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर या घटनेचे नाट्यरुपांतर करण्यात आल्याची माहिती 'एनडीटीव्ही'ने दिली आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके प्रकरणात जी गाडी दिसते त्या गाडीमागे पीपीई किट घालून जी व्यक्ती आहे, ती सचिन वाझे असावी, असा 'एनआयए'ला संशय आहे. या प्रकरणातील घटनाक्रम समजून घेण्यासाठी 'एनआयए'ने काल रात्री अंबानींच्या घराबाहेर नाट्यरुपांतर केलं. वाझेंना तीन वेळा पर्ट- पँटमध्ये चालण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना कुर्ता आणि डोक्यावर रूमाल टाकून चालण्यास सांगितले. कारण त्या गाडीच्या मागे जी व्यक्ती दिसते, त्या व्यक्तीनं सैल कुर्ता घातलेला होता. 'एनआयए'च्या म्हणण्यानुसार ती व्यक्ती सचिन वाझे आहेत.

काल सचिन वाझे प्रकरणाची सुनावणी न्यायालयासमोर झाली, यावेळी 'एनआयए'ने न्यायालयात आपले लेखी उत्तर सादर केले. आता 30 मार्च रोजी पुढील सुनावणी आहे. याप्रकरणात काल एनआयए आणि एटीएस यांना 17 जानेवारीचे सीसीटीवी फुटेज मिळाले आहेत, यात मनसुख हिरेन आणि वाझे एकत्र असल्याचे दिसले. 

"पोलिस अधिकारी सचिन वाझेंबाबत तपासात चुक झाली, अशी चुक पुढे पोलिस करणार नाहीत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. वाझें प्रकरणामुळे सरकारच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही," असेही राऊत यांनी काल स्पष्ट केले. 

संजय राऊत म्हणाले, "सरकार कोणाचेही असले तरी पोलिस यंत्रणा ही सरकारचाच एक भाग असते. संपूर्ण प्रशासनन यंत्रणा ही सरकारची असते. हे आपण नाकारू शकत नाही. एखाद्याने जर चुक केली तर त्याला सरकार जबाबदार असते. चुकीच्या विषयाची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक यांच्या बदल्या केल्या आहेत. पहिल्यांदाच असा मोठा बदल केला आहे. मुंबई पोलिस दलाची फेररचना करण्यात येत आहे." 

Edited  by :  Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख