महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी : हाफकिन करणार लसनिर्मिती, ठाकरे सरकारची मागणी मान्य

भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पध्दतीने कोवॅक्सीन या लसीचे उत्पादन घेण्यास मान्यता मिळाली आहे.
Approval to Haffkine Institute to produce Covaxin vaccine
Approval to Haffkine Institute to produce Covaxin vaccine

मुंबई : देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. तसेच लसीकरणातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. पण केंद्र सरकारकडून अपेक्षित डोस मिळत नसल्याने लसीकरणाला मर्यादा येत असल्याचे ठाकरे सरकारकडून अनेकदा सांगण्यात आले आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठी महाराष्ट्रातील हाफकीन संस्थेला लसनिर्मितीची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. मोदी सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. 

मुंबईतील हाफकीन बायो फार्मा कॅार्पोरेशन या संस्थेला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पध्दतीने कोवॅक्सीन या लसीचे उत्पादन घेण्यास मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने ठाकरे सरकारच्या मागणीला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच मोठ्या प्रमाणावर लस उत्पादनाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महाराष्ट्रातील लसीची दैनंदिन गरज भागविणे सहज शक्य होणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. हाफकिनला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली. आपल्या विनंतीचा स्वीकार करत केंद्राने परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, असे मुख्यमंत्र्यांच्या ट्विटरवर म्हटले आहे. 

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्राद्वारे हे कळविले आहे. त्यानुसार कोवॅक्सीन ही लस बनविण्यासाठी एक वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजूरी देत ही शिफारस केल्याचे स्वरूप यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच हाफकिन संस्थेने लवकरात लवकर उत्पादन सुरू करावे. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञांची नियुक्ती तातडीने करावी, असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे. 

हाफकीन संस्थेविषयी...

वाल्देमार मोर्डेकाय हाफकिन हे 1892 मध्ये कॉलराची साथ हाताळण्यासाठीचे काम हाती घेऊन भारतात आले. त्यांनी विशेष लशींमधील उपचार पद्धतींचा अवलंब करुन प्राणघातक रोगांचा प्रसार होऊ नये, यासाठी लढा दिला. 1896 मध्ये प्लेगचा उद्रेक झाल्यानंतर, प्लेग संशोधन प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी ते मुंबईत आले.

जीवरक्षक लसी व औषधे यांना वाढत असलेली मागणी व उत्पादन प्रक्रियेसाठी करावा लागणारा विस्तार लक्षात घेता, 1975 साली हाफकिन या संस्थेचे विभाजन करण्यात आले. औषधे निर्मितीसाठी कारखाना अधिनियम 1956 अंतर्गत पूर्णपणे महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेले हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ मर्यादित याची स्थापना केली. 1977 साली गोळ्या, कैपस्युल्स्, मलम आदीसाठी हाफकिन अजिंठा, जळगाव या नावाने उपकंपनी स्थापन केली गेली.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com