नाईक कुटूंबियांचे फडणवीसांवर गंभीर आरोप... - Anvay Naik family criticise devendra fadanvis over suicide case | Politics Marathi News - Sarkarnama

नाईक कुटूंबियांचे फडणवीसांवर गंभीर आरोप...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 मार्च 2021

मागील सरकारने हे प्रकरण बंद करण्यासाठी त्यावेळी दबाव टाकण्यात आला. जबरदस्तीने आमची सही घेण्यात आली, असा आरोप आज नाईक कुटूंबियांनी केला आहे. 

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही. विरोधकांकडून त्याबाबत दिशाभूल केली जात आहे. मागील सरकारने हे प्रकरण दाबलं. हे प्रकरण बंद करण्यासाठी त्यावेळी दबाव टाकण्यात आला. जबरदस्तीने आमची सही घेण्यात आली, असा आरोप आज नाईक कुटूंबियांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 

विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा उल्लेख करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला. फडणवीस यांनी हे प्रकरण दाबल्याचा आरोप देशमुख यांनी केला. यावेळी फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला. न्यायालयाने या प्रकरणात स्वयंस्पष्ट अभिप्राय दिला आहे. त्यामुळे देशमुख यांनी खोटे आरोप करून न्यायालयाचाही अवमान केला, असे फडणवीस म्हणाले. त्यावरून फडणवीस यांनी गृहमंत्र्यांवर हक्कभंगही दाखल केला आहे. 

त्यानंतर आज अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक व मुलगी आद्या यांनी पत्रकार परिषदेत फडणवीसांवर टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने अजून या प्रकरणावरून निकाल दिलेला नाही. मागील सरकारच्या काळात आमची केस दाबण्यात आली. या प्रकरणाचीही चौकशी व्हायला हवी. त्यावेळी केस बंद करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकून जबरदस्तीने सही घेतली. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हायला हवी. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तिघांची नावे लिहिलेली आहे. त्यांना का अटक होत नाही? त्यांच्या पेक्षा आमचीच जास्त चौकशी करण्यात आली, अशी मागणी नाईक कुटूंबियांनी केली.

वडिलांनी अनेक नेत्यांना जागा विकल्या आहेत. तो आमचा आधीपासूनच व्यवसाय आहे. आम्ही आमच्याकडी सर्व पुरावे देतो. इतरांकडूनही घ्यावेत. जमिन देवाण घेवाण ही 8 वर्षापूर्वी झाली होती. त्याचा आता काहीही संबंध नाही. यावर आमच्यासोबत 'चाय पे चर्चा' करावी, त्यातून कोण खरे अन् कोण खोटे हे कळेल, असे खुले आव्हान नाईक कुटुंबियांनी दिले आहे. 

विधानसभेत माझा वडिलांच्या संदर्भात चर्चा झाली. पण आम्हाला न्याय कधी मिळणार? मनसुख हिरेन यांच्या केसप्रमाणे पोलिस आमच्या केसमध्येही असे काम का करत नाहीत, असा सवाल आद्या नाईक यांनी उपस्थित केला. सर्वांना न्याय हा सारखा असतो मग तोच न्याय आम्हाला का नाही. कोरोना काळात पोलिसांनी चांगली सेवा केली. त्यांच्यावर तोंडाला काळीमा फासणारं वक्तव्य शोभत नाही, असे टोलाही त्यांनी लगावला.

अंबानींना धमकी येते त्याची चौकशी होते. मुलीचं लग्न कसं होतं ते पाहतो, अशी आम्हालाही धमकी आली आहे. त्याचीही चौकशी करावी. राजकाराणासाठी आमचा वापर होत नाही. पञकार परिषद घेण्यासाठी आमच्यावर कुणाचा दबाव नाही. आमचा आरोप हे प्रकरण दाबले, त्या मागच्या सरकारवर आहे, असे नाईक कुटूंबीय म्हणाले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख