आरोप सिद्ध झाले तरच अनिल देशमुख पायउतार... - Anil Deshmukh will not step down unless allegations are proved, says Nawab Malik | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आरोप सिद्ध झाले तरच अनिल देशमुख पायउतार...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 मार्च 2021

परमबीर यांनी केलेल्या आरोपाची व लिहिलेल्या पत्राची कसून चौकशी केली जाईलच, तेव्हा सत्य समोर येईल. परमबीर यांच्याकडून पत्रामध्ये ज्या तारखांचा उल्लेख देशमुख-परमबीर भेटीबाबत केला गेला होता, त्या तारखांना गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाचे निदान झाल्याने ते विलगीकरणात होते.

मुंबई: भाजपच्या नेत्यांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी महाविकास आघाडी सरकारमधील व खास करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून देशमुखांना क्लीन चिट देत त्यांची पाठराखण केली जात असल्याचे दिसते. देशमुख यांच्यावर माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीबाबतचा आरोप केला असून राज्यासह देशात हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र मंत्री नवाब मलिक यांनी देशमुख यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याशिवाय ते पायउतार होणार नाहीत, असे वक्तव्य सोमवारी केले असून एकाप्रकारे देशमुखांची पाठराखणच केल्याचे दिसून येते. 

नवाब मलिक म्हणाले, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर व गृहमंत्र्यांवर अधिकाऱ्यांनी सवाल उपस्थित केला, त्यावेळी राजीनामा घेतला होता का? परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांचे पत्र ठरवून केलेल्या कटाचा भाग आहे. परमबीर यांच्या बदलीनंतरच वसुलीबाबतचा आरोप त्यांनी का केला हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. परमबीर यांनी केलेल्या आरोपाची व लिहिलेल्या पत्राची कसून चौकशी केली जाईलच, तेव्हा सत्य समोर येईलच. परमबीर यांच्याकडून पत्रामध्ये ज्या तारखांचा उल्लेख देशमुख-परमबीर भेटीबाबत केला गेला होता, त्या तारखांना गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाचे निदान झाल्याने ते विलगीकरणात होते.

१ ते ५ फेब्रुवारीदरम्यान देशमुख विदर्भ दौऱ्यावर होते. तर १५ फेब्रुवारी रोजी देशमुखांना कोरोनाचे निदान झाले व २८ फेब्रुवारीपर्यंत ते कोणालाही भेटले नाहीत. तपासात सत्य बाहेर येणार असून देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. केवळ पत्राच्या आधारे देशमुख यांचा राजीनामा घेणार नसून आरोप सिद्ध झाले तरच राजीनामा घेऊ, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.    

मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला. देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझेला दिले होते, असा खळबळजनक दावा परमबीर सिंह यांनी केला. याबाबत परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणावरून राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जनमानसात देखील देशमुख, वाझे व परमबीर सिंह यांचीच चर्चा होताना दिसते. दरम्यान, १०० कोटींच्या प्रकरणाबाबत भाजप चांगलीच आक्रमक झालेली दिसत असून देशमुख यांना पदावरून तातडीने हटवावे, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख