मुंबई पोलिसांबाबत फडणवीस अशी भाषा कशी वापरु शकतात... - Anil Deshmukh criticizes Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

मुंबई पोलिसांबाबत फडणवीस अशी भाषा कशी वापरु शकतात...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 9 मार्च 2021

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आज विधानसभेचे सभागृह दणाणून सोडले.

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आज विधानसभेचे सभागृह दणाणून सोडले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी लावून धरत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला. तब्बल नऊ वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.  

देशमुख म्हणाले, ''फडणवीस महाराष्ट्रावर एवढा राग का काढत आहेत हेच समजत नाही. याबाबतच्या राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. परंतु, त्यांचे आरोप हे महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत. महाराष्ट्र पोलिस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्याचे नव्हे तर पोलिसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला उज्वल परंपरा आहे. स्वत: फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलिस दलाचे नेतृत्व केले आहे. पाच वर्षे याच पोलिसांनी त्यांना साथ दिली. प्रशासन चालविण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. त्यांचे 'मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले'' आहे. अशाप्रकारची भाषा हे वापरू कशी शकतात?" 

खळबळजनक : पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेची फडणवीस यांची मागणी

 

आपल्या समाजाचे म्हणून काही आदर्श आहेत. सामान्य माणसाचा कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास त्यामुळे टिकून आहे. क्षुद्र राजकारणासाठी आपण या पध्दतीचे आरोप करून सामान्य जनतेचा हा विश्वास डळमळीत करू नका असे माझे फडणवीस यांना आवाहन असल्याचे देशमुख म्हणाले. 

दरम्यान, आज विधीमंडळाचे कामकाज सुरु झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीपासून मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा मुद्दा उचलून धरत सरकारवर ताशेरे ओढले. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. फडणवीसांचा आक्रमकपणा पाहून शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा पुढे करण्यात आला. त्यावरून फडणवीस आणि अनिल परब यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. 

..मग खडसेंच्या अटकेची गरज काय? उच्च न्यायालयाचा सवाल?
 

दहा मिनिटांनी कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात गृहमंत्री अनिल देशमुख हजर नव्हते. त्यावेळी फडणवीस यांनी ते येईपर्यंत कामकाज सुरू न करण्याची विनंती अध्यक्षांना केली. त्यावर आमदार नाना पटोले यांनी कामकाज सुरू करण्याची मागणी केली. गृहमंत्री येईपर्यंत कामकाज पुढे सुरू ठेवावे, असे ते म्हणाले. पण विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाची मागणी उचलून धरण्याने सभागृह तहकूब करण्यात आले. 

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर देशमुख यांनी निवेदन केले. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडून केला जात आहे. विरोधी पक्षांकडे पुरावे असतील तर एटीएलला द्यावेत. कुणालाही पाठिशी घालणार नाही. एटीएसमध्ये सचिन वाझे नाहीत. त्यामुळे निपक्षपणे तपास केला जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. पण त्यावर फडणवीस यांचे समाधान झाले नाही. 

फडणवीस यांनी गृहमंत्र्यांवरच जोरदार टीका केली. गृहमंत्री वाझे यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच वाझे यांच्या अटकेची मागणीही केली. त्यानंतर सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. नाना पटोले यांनी त्यावर संताप व्यक्त केला. या गोंधळात नाना पटोले बोलण्यास उठले. त्यांनी थेट फडणवीस यांच्याकडील सीडीआरचा मुद्या उपस्थित केला. विरोधकांना सीडीआर कसा मिळाला, त्यांना तो अधिकार आहे का? त्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सभागृहामध्ये विरोधकांकडून कोविडच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणीही पटोले यांनी केली. 

पटोले यांच्या सीडीआरच्या मुद्यावर फडणवीस चांगलेच भडकले. त्यांनी मी सीडीआर मिळवल्याचे सांगत चौकशी करण्याचे आव्हान दिले. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख