औरंगाबादनंतर या शहराच्या नावावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? - After Aurangabad, the name of this city is likely to fail in the Mahavikas front | Politics Marathi News - Sarkarnama

औरंगाबादनंतर या शहराच्या नावावरुन महाविकास आघाडीत बिघाडी?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

उस्मानाबादमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवर त्याची माहिती देताना शहराचा उल्लेख  'धाराशिव-उस्मानाबाद' असा करण्यात आला आहे.

मुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर, महाविकास आघाडी सरकारमध्येही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद रंगलेला असताना आता उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दाही कळीचा ठरण्याची शक्यता आहे.

उस्मानाबादमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवर त्याची माहिती देताना शहराचा उल्लेख  'धाराशिव-उस्मानाबाद' असा करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादशी संदर्भात निर्णय झाला, तेव्हा त्याची माहिती देताना सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख होता. तर काल उस्मानाबादबाबत निर्णय झाला त्यावेळी धाराशिव असा उल्लेख करण्यात आला. प्रसिद्धीपत्रकात उस्मानाबाद असाचा उल्लेख होता. परंतु सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवर धाराशिव-उस्मानाबाद असा उल्लेख केला आणि  चर्चेला सुरुवात झाली.

 

याबाबत काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "आम्ही याबाबत एकत्र बसून चर्चा करु. कोणी  संभाजीनगर बोलू दे, कोणी औरंगाबाद बोलू दे, कोणी धाराशिव बोलू दे, किंवा कोणी उस्मानाबाद बोलू दे. यामुळे महाविकास आघाडी सरकारला काही फरक पडणार नाही, हे सरकार पाच वर्षे  टिकेल," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

राज्य सरकारचा निर्णय काय?

उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे तसेच 430 खाटांचे रुग्णालये सुरु करण्यास करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रस्वावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये 674.14 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख