आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु ! दीड लाख जागा उपलब्ध : नवाब मलिक

यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार, तर खासगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकुण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
Navab Malik.jpg
Navab Malik.jpg

मुंबई : राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (ITI) आज प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. (Admission process for ITI started! One and a half lakh seats available: Nawab Malik)

यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार, तर खासगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकुण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने राज्यातील आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रवेश प्रक्रिया सुरु होताच अवघ्या काही वेळातच १५ इच्छूक उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले. संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. एकुण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असुन ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण वा अणुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्य प्रशिक्षण मिळून त्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे, यासाठी त्यांना ११ अभ्यासक्रमांमध्ये संधी देण्यात येत आहे.

सर्व शिक्षण मंडळांचा इयत्ता दहावीचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. दहावीचे निकाल घोषित झाल्यानंतर सविस्तर प्रवेश वेळापत्रक संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात येईल. तोपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेणे तसेच प्रवेश अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज आजपासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

प्रवेश प्रक्रिया, नियमावली, पध्दती, आवश्यक कागदपत्रे, संबंधीत शासननिर्णय, विविध योजना, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता, इत्यादींबाबत इत्यंभूत माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

हरकती नोंदविणे, विकल्प अर्ज भरणे, ऑनलाईन स्वरुपात प्रवेश अर्ज शुल्क भरणे इत्यादी सुविधा अर्जदारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच प्रवेश अर्ज  "MahaITI App"  या मोबाईल ॲपच्या आधारे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यातील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले.

राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान १ शासकीय आयटीआय सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र २ संस्था व ४३ शासकीय आयटीआमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी आश्रमशाळा आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात एकूण ५४९ खाजगी आयटीआय आहेत.

सन २०१३ मध्ये शासकीय आयटीआय संस्थेतील प्रवेशप्रक्रिया व सन २०१५ मध्ये खाजगी आयटीआय संस्थेतील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे मंडळाकडुन सर्व परीक्षार्थ्यांची माहिती संचालनालयास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आयटीआय संस्थेत प्रवेश अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांचा इयत्ता दहावी परिक्षेचा बैठक क्रमांक (Seat Number) नमुद केल्यास त्यांची वैयक्तिक व इयत्ता दहावीच्या परिक्षेतील गुण याबाबत सर्व माहिती प्रवेश अर्जात आपोआप नमुद होईल (Auto Populate). तसेच ज्या उमेदवारांनी इतर मंडळांमार्फत इयत्ता दहावी परीक्षा दिली असेल, त्यांना त्यांची सर्व माहिती प्रवेश अर्जात नमुद करावी लागेल.

प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर सर्व ऑनलाईन पेमेंट माध्यमे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी कोणत्याही आयटीआय संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.

आयटीआय प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा न घेता संबंधित मंडळांनी निर्गमित केलेल्या दहावीच्या गुणपत्रिकेतील गुण व प्रवेश नियमावलीनुसार निर्धारित गुणाधिक्य याआधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन निर्धारित प्रवेश नियमावली व पध्दतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

युवकांना आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा, यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आली.

शिकाऊ उमेदवारांना केंद्रशासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण ११ हजार औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण १ लक्ष जागा स्थित करण्यात आलेल्या आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपेक्षा शिकाऊ उमेदवारीसाठी उपलब्ध जागा अधिक असल्याने प्रत्येक उत्तीर्ण उमेदवारास संधी उपलब्ध आहे.

इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येणार आहे. आयटीआय संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com