अन् शिवसेनेच्या युवराजांना मिळाली कलिंगडाची भेट  - Aditya Thackeray got a gift of watermelons and Cucumber | Politics Marathi News - Sarkarnama

अन् शिवसेनेच्या युवराजांना मिळाली कलिंगडाची भेट 

मुझफ्फर खान
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रामपूर येथे सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. 

चिपळूण : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे रामपूर येथून परत येत असताना त्यांनी तांबी गावातील रस्त्यावर आपले वाहन थांबवले. गाडीतून उतरून त्यांनी चक्क कलिंगड विक्रेत्यांची चौकशी केली. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे 'युवराज' असे म्हटले जाते. पण, त्यांचा साधेपणा आज चिपळूणच्या दौर्‍यातील या कृतीतून दिसून आला. शेतकर्‍याने आनंदाच्या भरात ठाकरेंना कलिंगड आणि काकड्यांची भेट दिली. 

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रामपूर येथे सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. चिपळूणातील पवन तलाव मैदानावर आदित्य ठाकरेंच्या हॅलिकॉप्टरचे आगमन झाले. चिपळूण ते रामपूर त्यांनी वाहनांच्या ताफ्यातून प्रवास केला. या दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सुरक्षा रक्षकांचे कवच असताना ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले. हात उंचावून त्यांना नमस्कारही केला. 

नोकरी महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर ठाकरे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणातील घराकडे जाण्यासाठी रवाना झाले. पोलिस आणि कार्यकर्त्यांच्या वाहनांचा मोठा ताफा त्यांच्या वाहनाच्या मागे-पुढे होता. तांबी येथे आल्यानंतर आदित्य ठाकरेंची नजर रस्त्यावर बसलेल्या कलिंगड विक्रेत्याकडे गेली. त्यानी वाहन चालकाला गाडी थांबवण्याची सूचना केली. रस्त्यालगत ठाकरेंचे वाहन थांबले. 

पूजा चव्हाण प्रकरणातील ते मंत्री गायब...पण त्यांची गाडी सापडली..

त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. गाडीतून उतरून ठाकरे तांबी गावातील कलिंगड विक्रेते रामचंद्र उदेग यांच्या जवळ गेले. तुम्ही हे कलिंगड कोठून आणलेत अशी विचारणा ठाकरेंनी उदेग यांना केली. त्यावर उदेग यांनी मी स्वतः कलिंगडचे पीक घेतल्याचे सांगितले. ठाकरेंनी उदेग यांच्याकडून कलिंगड व इतर शेती पिकाची माहिती करून घेतली. यातून मिळणारा नफा आणि लागणारी मेहनतही जाणून घेतली. उदेग यांनी कलिंगड आणि इतर पिकांची विस्तृत माहिती ठाकरेंना दिली. 

माझ्या पोटातील पाणीही हलले नाही पाहिजे..नाहीतर काम उखडून टाकीन : नितीन गडकरींची तंबी 
 

आमदार भास्कर जाधव यांनी कळंवडे व तांबी गावातील शेतकर्‍यांचे वैशिष्ट्ये ठाकरेंना सांगितले. ठाकरेंनी सामान्य शेतकर्‍याची विचारपूस केल्याबद्दल उदेग यांनाही आनंद झाला. त्यांनी एक कलिंगड आणि काकड्या ठाकरे यांना भेट म्हणून दिल्या. आदित्य ठाकरेंनी नम्रपूर्वक त्याचा स्वीकार करून साधेपनाची चुणूक दाखवून दिली. 

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख