अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेला होकार कळविला !  - Actress Urmila Matondkar says yes to Shiv Sena! | Politics Marathi News - Sarkarnama

  अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेला होकार कळविला ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूकही लढविली होती

मुंबई : आपण आमदार होण्यास तयार आहोत असा होकार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेला कळविला असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूकही लढविली होती. त्यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर त्या पक्षात सक्रिय राहिल्या नाहीत

. त्या राजकारणापासून दूर राहिल्या. सुशांतसिंह प्रकरणानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या. अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूड आणि मुंबईविषयी जी काही मुक्ताफळे उधळली होती त्याला मातोंडकर यांनी जशास तसे उत्तर देऊन आपला मराठीबाणा दाखविला होता. 

राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या रिक्त जागांपैकी एका जागेवर मातोंडकर यांच्या नावाची शिवसेनेकडून शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोंडकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. 

 इंडियन एक्‍प्रेसशी बोलताना संजय राऊत यांनी मोतोंडकर यांनी आमदार होण्यास होकार दिल्याची माहिती दिली आहे. 

उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी उत्तर मुंबईतून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. गेल्या काही दिवसांपासून मातोंडकर सामाजिक विषयांवर खूप आक्रमक भूमीका मांडत आहेत.

महाराष्ट्र, मुंबई यावरही त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत घेण्याचा विचार केला जाऊ शकतो. 

 मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यासंदर्भात मी देखील चर्चा ऐकली आहे. हा निर्णय मंत्रीमंडळ घेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रीमंडळाने निर्णयाचे अधिकार दिले आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर काल राऊत म्हणाले, की त्या आमदार होण्यास तयार आहे. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख