अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल - Actor Mithun Chakraborty's wife and child charged | Politics Marathi News - Sarkarnama

अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

त्यांच्यावर दिल्ली मन्यायल्याच्या आदेशानुसार दोन वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधेरी : बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आणि पत्नी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून गुरुवारी (ता.17) रात्री ओशिवरा पोलिस ठाण्यात धमकावून गर्भपात करण्यास प्रवृत्त करणे आणि लैंगिक अत्याचाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबत अधिक चौकशी करीत आहेत. 

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती आणि पत्नी योगिता बाली यांच्याविरोधात एका 38 वर्षीय अभिनेत्रीने ही तक्रार केली आहे. त्यांच्यावर दिल्ली मन्यायल्याच्या आदेशानुसार दोन वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच पोलिस या दोघांचा जबाब नोंदविणार असल्याची माहिती आहे. पीडित अभिनेत्री ही मुळची गुजरातमधील रहिवाशी असून, तिचे बी.कॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. 

तिने आतापर्यंत देशात विविध राज्यांत एक हजारापेक्षा जास्त डान्स शोमध्ये सहभाग घेतला असून, भोजपुरी, हिंदी, मल्याळम, तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. महाक्षय याची पीडित अभिनेत्रीशी पाच वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. महाक्षय याने 2015 मध्ये तिला घरी बोलावून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

 त्यानंतर लग्नाचे प्रलोभन दाखवून सातत्याने तीन वर्ष तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यातून ती गरोदर राहिली. त्यामुळे त्याने तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त केले. महाक्षयच्या आई योगिता बाली हिनेही तिला धमकावले, असे या अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले आहे.

तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग
पीडित अभिनेत्रीने दिल्लीतील रोहिणी स्थानिक न्यायालयात योगिता बाली, महाक्षय चक्रवर्ती यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. मात्र मुंबईत गुन्हा घडल्याने त्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दोन वर्षांनंतर अभिनेत्रींच्या तक्रार अर्जावरून ओशिवरा पोलिसांनी महाक्षय आणि योगिता बाली यांच्या विरोधात बलात्कारासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल केला. पोलिस लवकरच दोघांची जबानी नोंदविणार असल्याची माहिती उपलब्ध आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख