गोस्वामींवरील कारवाई म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या खांबावरील हल्ला, अमित शहांकडून निषेध  - The action against Goswami is an attack on the fourth pillar of democracy, a protest by Amit Shah | Politics Marathi News - Sarkarnama

गोस्वामींवरील कारवाई म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या खांबावरील हल्ला, अमित शहांकडून निषेध 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

अमित शहा यांनीही गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध केला आहे.

मुंबई : पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर जी कारवाई केली त्याचा आम्ही निषेध करतो. कॉंग्रेस आणि त्यांच्या आघाडीने पुन्हा एकदा लोकशाहीला लज्जीत केले आहे.

आज लोकशाहीच्या चौथ्या खांबावर जो हल्ला झाला असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 

गोस्वामी यांच्या अटकेनंतर देशभर आरोपप्रत्योरोप सुरू आहे. काहीजण गोस्वामी यांची बाजू घेत आहेत तर काहीजणं त्यांना विरोध करीत आहे. गोस्वामींवरील कारवाईनंतर कॉंग्रेस, भाजप,शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी ट्विट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्यातच अमित शहा यांनीही गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात सत्तेचा गैरवापर करण्यात आला असून हा विचार स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीतील चौथ्या खांबावरील हल्ला आहे त्याचा मी निषेध करतो. 

गोस्वामीवरील कारवाईने पुन्हा एकदा आणीबाणीने आठवण करून दिली. माध्यमांवरील हल्ल्याला आम्ही विरोध करीत राहू असेही शहा यांनी म्हटले आहे. 

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या 2018 मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. पोलिस अर्णब यांना घेऊन अलिबागकडे रवाना झाले आहेत. 

आज सकाळीच सुमारे डझनभर पोलिस अर्णब यांच्या निवासस्थानी गेले. तेथून त्यांना अक्षरशः उचलून पोलिस व्हॅनमध्ये कोंबण्यात आल्याचा आरोप रिपब्लिक टिव्हीने केला आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली.

पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे 

अन्वय नाईक व त्यांच्या मातुश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे 5 कोटी 40 लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. 

त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख