दिल्लीचे पातशहा महाराष्ट्राची कोंडी करीत आहेत...आडमुठेपणामुळे लसीकरण थांबले. -   shivsena slams bjp central government on oxygen supply | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्लीचे पातशहा महाराष्ट्राची कोंडी करीत आहेत...आडमुठेपणामुळे लसीकरण थांबले.

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 मे 2021

महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही.

मुंबई :  "महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री व सरकार असल्याने दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱहेने कोंडी करीत आहेत. महाराष्ट्राचे कोरोनाचे लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबले आहे. महाराष्ट्राला इंजेक्शन, औषधांचा पुरवठा नीट होत नाही. ज्या महाराष्ट्राने आर्थिक प्राणवायूचा पुरवठा देशाला केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात काहीही करून राजकीय व आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरूच आहे," अशी टीका आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आली आहे.

महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे, बूड आहे म्हणून तो टिकला आहे. महाराष्ट्रनिर्मितीचा क्षण हा मंगलमयच असतो. तो दिवस महाराष्ट्राचे शौर्य व धैर्य दाखविणारा असतो. आज महाराष्ट्रावरचे संकट मोठे आहे. कोरोना विषाणूने मोठे आव्हान उभे केले आहे. शंभर वादळे, शंभर भूकंपांनी पडझड होणार नाही त्यापेक्षा जास्त पडझड एका विषाणूने केली. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील आणि विजयी होईल, असा विश्वास अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र आज कडक निर्बंधात जखडून पडला आहे. लोकांच्या जगण्यावरच बंधने पडली आहेत. सभोवती वातावरण निराशा आणि मरगळ आणणारे आहे. मृत्यूंच्या बातम्यांनी मन रोज बधीर होत आहे. चांगले काही घडत नाही. घडण्याची शक्यता नाही. देश, राज्य, समाज, धर्म या सर्व संकल्पना बाद ठरवून प्रत्येकजण फक्त जगण्याचाच संघर्ष करीत आहे. अशा वातावरणात महाराष्ट्र दिन कसा साजरा करावा, असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात..
 
महाराष्ट्राने कधीच स्वाभिमानासाठी तडजोड स्वीकारली नाही. आजच्या संकटातही महाराष्ट्र ताठ कण्यानेच लढतो आहे. दिल्लीतील सरकारे बदलत राहिली तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राच्या हक्काचे व न्याय्य वाटय़ाचे काही मिळूच द्यायचे नाही. महाराष्ट्राला ओरबडायचे, त्याची लूट करायची हे धोरण मात्र सर्व काळात कायम राहिले. महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प व योजना गुजरातला नेऊन ठेवल्या. मुंबईचे महत्त्व कमी करायचे व महाराष्ट्राची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू. त्याच गुजरात राज्यात शेवटी कोरोना रुग्ण रस्त्यांवर तडफडून प्राण सोडताना दिसत आहेत. हे दृश्य विदारक आहे. महाराष्ट्र व गुजरात ही तशी जुळी भावंडे. सदैव एका नात्याने एकत्र राहिले. त्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आजही होतच आहे. गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे. संकटाशी लढण्याची मोठी परंपरा हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात पंडित नेहरू प्रतापगडावर आले तेव्हा त्यांच्यासमोर निधडय़ा छातीने महाराष्ट्र उभा राहिला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख