परीक्षांबाबत घडामोडींना वेग; मुख्यमंत्री घेणार एक वाजता बैठक - Uddhav Thackeray To Take meeting about Examination today | Politics Marathi News - Sarkarnama

परीक्षांबाबत घडामोडींना वेग; मुख्यमंत्री घेणार एक वाजता बैठक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 जुलै 2020

कुलपती या नात्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय महेता आणि खात्याचे सचिव सौरभ विजय यांना सकाळी ११ वाजता राजभवनावर बोलावून घेतले आहे. काल त्यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना चर्चेसाठी बोलावून घेतले होते असे सुत्रांनी सांगितले

मुंबई  : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनांनंतर आज पदवी परीक्षांचा विषय धसास लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी ‍१ वाजता आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परीक्षांसंबंधी बैठक बोलावली आहे. परीक्षा रद्द करण्याचा अधिकार या कायद्यान्वये मुख्यमंत्र्यांना आहे असे सांगण्यात येते.

दुसरीकडे कुलपती या नात्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय महेता आणि खात्याचे सचिव सौरभ विजय यांना सकाळी ११ वाजता राजभवनावर बोलावून घेतले आहे. काल त्यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना चर्चेसाठी बोलावून घेतले होते असे सुत्रांनी सांगितले.

परीक्षांबाबत निर्णय होण्या ऐवजी गोंधळात आणखीनच भर पडत असल्याने पालक देखील चिंतेत आहेत. मुळात राज्य सरकार आणि केंद्र सरकार तसेच राज्यातील भारतीय जनता पक्ष यांच्यातील परस्पर राजकारणाचा परिणाम परीक्षांबाबत योग्य निर्णय घेण्यावर झाला आहे. राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या महिनाभरापासून या विषयात राजकीय अंगाने चर्चा होऊ लागली. त्यातूनच गोंधळाला सुरवात झाली.

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सर्वात आधी भारतीय जनता पक्षाने आणि भाजपाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेने राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांना विचारात न घेता परस्पर विद्यापीठ अनुदान आयोगाला परीक्षा रद्द करण्यासंदर्भात पत्र पाठविल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी या निर्णयाला आक्षेप घेतला. राज्यपाल हे राज्यातील सर्व विद्यापीठाचे कुलपती असतात. या त्यांच्या आधिकारात राज्य सरकारला परीक्षा घेण्याचे आदेश दिल्याने राज्य सरकारची कोंडी झाली.

या विषयात सुरुवातीपासूनच राजकारण सुरू झाल्याने परिस्थितीनुरूप योग्य निर्णय होण्याऐवजी राजकारण आल्याने परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थ्यांच्या हितसंबंधाला बाधा आणण्याचे काम राजकीय पक्षांकडून सुरू झाले. लवकरात लवकर या संबंधी निर्णय घेतला जावा, अशी विद्यार्थी आणि पालकांची अपेक्षा आहे. मात्र, कोणताही योग्य निर्णय होण्याऐवजी गोंधळ आणि संभ्रम वाढविण्याचे काम करण्यात येत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीची भावना आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख