मुंबई विद्यापीठ : योगेश सोमण यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक - Students Aggressive again Against Yogesh Soman in Mumbai University | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई विद्यापीठ : योगेश सोमण यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जुलै 2020

योगेश सोमण यांनी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून विद्यार्थी संतप्त झाले होते. तसेच, विभागाने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम दिलेला नाही. कोणताही विषय शिकवत असताना त्याचे प्रात्यक्षिक योग्य प्रकारे शिकविले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय पूर्णपणे कळत नाही, असे आरोप विद्यार्थ्यांनी केले होते

मुंबई  : मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे संचालक योगेश सोमण यांच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या सत्यशोधन समितीने सोमण यांना क्‍लीन चिट दिली आहे. त्यामुळे सोमण पुन्हा मुंबई विद्यापीठाच्या सेवेत रुजू झाल्याने याविरोधात अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सोमण यांना पदावरून दूर करून विद्यापीठातील राजकारण थांबवा, असा संदेश विद्यार्थ्यांकडून कुलगुरूंना मोबाईलवर पाठवण्यात येत आहे.

सोमण यांनी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून विद्यार्थी संतप्त झाले होते. तसेच, विभागाने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम दिलेला नाही. कोणताही विषय शिकवत असताना त्याचे प्रात्यक्षिक योग्य प्रकारे शिकविले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय पूर्णपणे कळत नाही, असे आरोप विद्यार्थ्यांनी केले होते. याप्रकरणी संचालकांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. अखेर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने सत्यशोधन समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल शिक्षक-विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नसतानासुद्धा सोमण  ७ जुलै रोजीच्या विभागप्रमुखांच्या बैठकीत हजर झाले. याची माहिती मिळताच विद्यार्थी त्यांना पदावरून हटविण्याची मागणी करत आहेत.

...तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील!
विद्यापीठ प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना मोबाईलवर संदेश पाठवण्याचे आंदोलन सुरू केले आहे. 'आम्ही आहोत, म्हणून तुम्ही आहात. तुम्ही आहात म्हणून आम्ही नाही', 'आम्ही इथे चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी आलो आहोत. यासाठी शुल्कही दिले आहे; मात्र येथे राजकारणच होत असून हे थांबवून सोमण यांना पदावरून तातडीने हटवा,' असे संदेश विद्यार्थ्यांकडून पाठविण्यात येत आहेत. जोवर विद्यापीठ सोमण यांना पदावरून दूर करत नाही, तोवर विविध माध्यमातून आंदोलन सुरूच राहील, असे विद्यार्थी अपूर्व इंगळेने सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख