लॉकडाउनने उधळले धनंजयच्या वैवाहिक जीवनाचे स्वप्न 
PSI Dhananjay Honmane Martyered in Naxalites attack

लॉकडाउनने उधळले धनंजयच्या वैवाहिक जीवनाचे स्वप्न 

काही दिवसांवर येऊन ठेपलेले त्याचे लग्न, आई-वडिल त्याची घरी येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. ठरल्यानुसार मार्चमध्ये तो गावी येणारही होता. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाउन घोषित करण्यात आले. त्यामुळे त्याचे गावी येणे लांबणीवर पडले आणि....

पुणे : काही दिवसांवर येऊन ठेपलेले त्याचे लग्न, आई-वडिल त्याची घरी येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. ठरल्यानुसार मार्चमध्ये तो गावी येणारही होता. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाउन घोषित करण्यात आले. त्यामुळे त्याचे गावी येणे लांबणीवर पडले आणि काल त्याच्या वडिलांना फोन आला, "तुमचा मुलगा भामरागड येथे नक्षलवाद्यांशी लढताना हुतात्मा झाला' आणि कुटुंबांसह संपूर्ण पुळुज (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) गावावर शोककळा पसरते. 

ही ह्‌दयद्रावक कहाणी आहे, भामरागड येथे नक्षलवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेल्या पंढरपूर तालुक्‍यातील लिंगेश्वर नगरी पुळुज येथील पोलिस उपनिरीक्षक धनंजय तानाजी व्होनमाने या तरुणाची. 

तानाजी व्होनमाने हे शेतकरी, त्यांना विकास आणि धनंजय हे दोन मुलगे. धनंजय हा लहानपणापासून हुशार होता. पोलिस खात्यात भरती होऊन देशसेवा करण्याची त्याची इच्छा होती. त्यानुसार तो तीन वर्षांपूर्वी क्‍यूआरटी पथकात पोलिस उपनिरीक्षकपदी भरती झाला. थोरला भाऊ विकास हा उच्चशिक्षण घेत आहे. वडील तानाजी व्होनमाने आणि आई पुळुज येथे शेती करतात. 

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत धनंजयने प्राथमिक शिक्षण पुळुज येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात घेतले. त्यानंतर तो पोलिस खात्यामध्ये भरती झाला. घरात अठराविश्व दारिद्रय. त्या परिस्थितीवर मात केली पाहिजे, या जिद्दीने अभ्यास करून वेळप्रसंगी फावल्या वेळेत काम करून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्याने पोलिस उपनिरीक्षकपदास गवसणी घातली. तो गडचिरोली-भामरागड परिसरात तो कर्तव्य बजावत होता. 

धनंजय हा मार्चमध्ये गावी येणार होता. पण कोरोनामुळे अचानक लॉकडाउन घोषित झाले. त्यामुळे त्याचे गावी येणे पुढे ढकलले. तरीही तो आगामी चार दिवसांत येणार होता. पण, नियतीच्या मनात वेगळेच होते. नेहमीप्रमाणे भामरागड भागात पेट्रोलिंगला जात असताना नक्षलवाद्यांनी डाव साधून सकाळी सहाच्या सुमारास धनंजय व्होनमाने याचा समावेश असलेल्या तुकडीवर अचानक गोळीबार केला. त्याच वेळी फ्रंटवर असणारा धनंजय धैर्याने लढत होता. पण एका गोळीने त्याच्या छातीचा वेध घेतला आणि तो खाली कोसळला. 

काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लॉकडाउन उठल्यानंतर त्याची पोस्टिंग होणार होती. शिवाय, थाटामाटात लग्न करण्याचा मनसुबा भावी वधू-वरांसोबत आई-वडिलांचा होता. मात्र विधात्याच्या मनात वेगळेच होते. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा असणारा आमचा पाठीराखा गेला, अशी भावना त्यांचे मित्र इंद्रजीत बाबर यांनी व्यक्त केली . 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in