लॉकडाउनमुळे घरात बसून कंटाळलात; तर मग मालवणच्या तरुणांचा घ्या आदर्श!  - At Palsamba, the youth undertook the work of water supply scheme | Politics Marathi News - Sarkarnama

लॉकडाउनमुळे घरात बसून कंटाळलात; तर मग मालवणच्या तरुणांचा घ्या आदर्श! 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 19 मे 2020

लॉकडाउनमध्ये गावी अडकल्याने पळसंब (ता. मालवण) गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम तरुणांनी हाती घेतले आहे. 'ऍक्‍टिव्ह सरपंच' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पळसंबचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनीसुद्धा योग्य मार्गदर्शन करत गावातील बेकारी कमी होण्यासाठी आश्‍वासक असा प्रयोग सर्वांसमोर ठेवला आहे. 

मालवण : कोरोनामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. रोजगारासाठी मुंबईत गेलेले अनेक तरुण गावी परतत असताना पुन्हा मुंबईमध्ये न येण्याचा निश्‍चय बोलून दाखवत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दिलासादायक घटना समोर येत आहे. लॉकडाउनमध्ये गावी अडकल्याने पळसंब (ता. मालवण) गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम तरुणांनी हाती घेतले आहे. 

"ऍक्‍टिव्ह सरपंच' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पळसंबचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनीसुद्धा योग्य मार्गदर्शन करत गावातील बेकारी कमी होण्यासाठी आश्‍वासक असा प्रयोग सर्वांसमोर ठेवला आहे. 

पळसंब खालचीवाडी येथील अमोल साटम, विनय साटम, प्रथमेश वाघ, पप्पू साटम, परब आदी सातजण होळी व पाडव्याला मुंबईतून गावी आले होते. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर ते गावातच अडकून पडले होते. बिनकामाचे बसल्याने हे तरुण कंटाळले असतानाच वाडीतील नळयोजना दुरुस्त करण्याच्या कामाची निविदा ग्रामपंचायतीकडून निघाली. 

नुसतेच बसून राहण्यापेक्षा काही तरी काम करूया, तसेच यातून आर्थिक लाभसुद्धा होण्याच्या अपेक्षेने या युवकांनी सरपंच गोलतकर यांची भेट घेत काम करण्याचा मनोदय बोलून दाखविला. सरपंचांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत पाच लाख रुपये खर्चाच्या या कामासाठी निविदा प्रक्रियेच्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे या कामाला दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. 

स्वतःच्या वाडीतील काम असल्याने हे चाकरमानी तरुण कामसुद्धा मन लावून करू लागले आहेत. नळ पाणी पुरवठा योजना कामावर रोजगार उपलब्ध झाल्याने या मुंबईकर चाकरमान्यांना अर्थार्जनाचा मार्ग तर मिळालाच; पण त्यातून गावचे काम केल्याचे समाधानही मिळत आहे. 

कोकणात रोजगाराच्या दृष्टीने करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. चांगले अर्थार्जन करण्याचे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत; पण गरज आहे ती प्रबळ इच्छाशक्तीची ! कोरोना महामारीत "गड्या आपला गावच बरा' असा मनात निश्‍चय करून अनेक तरुण गावी परतत आहेत; पण गावी जाऊन रोजगाराचे करायचे काय? असा प्रश्‍न जर कुणाच्या मनात येत असेल तर पळसंब खालचीवाडीच्या या तरुणांचे काम निश्‍चितच दिशादर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे. 

लॉकडाउनमुळे मुंबईहून आलेले गावातील काही तरुण गावातच अडकून पडले. मुंबईतील परिस्थिती पाहून त्यांनी यापुढे मुंबईत न जाता गावातच राहण्याचा निर्णय घेतला. सध्या या तरुणांकडे काम नव्हते. याच दरम्यान ग्रामपंचायतीने पळसंब खालचीवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेची निविदा प्रसिद्ध केली होती. हे काम करण्याचा मनोदय या तरुणांनी बोलून दाखविला. त्यांचा निर्णय योग्य असल्याचे जाणून घेत तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर हे काम त्यांना देण्यात आले आहे. गावातील अन्य बेरोजगार तरुणांनी असाच पुढाकार घेतल्यास त्यांना अर्थार्जन मिळेल. 
- भालचंद्र गोलतकर, 
सरपंच, पळसंब (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख