परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्यपालांचे अजोय मेहतांना पाचारण - Governor Koshyare Summoned CM Thackery to Rajbhavan about Exams | Politics Marathi News - Sarkarnama

परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्यपालांचे अजोय मेहतांना पाचारण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 जुलै 2020

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरुंनी या संदर्भात काढलेल्या उद्गारांची चित्रफीत जारी केल्याने शैक्षणिक वातावरण ढवळले आहे.कुलगुरुंनी या संदर्भात राज्यपालांना पत्र लिहिले असून कुलपती या न्यायाने आदेश देण्याची विनंती केली आहे. या तिढयातून मार्ग काढण्यासाठी कायदेशीर तरतुदी काय आहेत, परीक्षा घेण्याचा अधिकार कोणाचा या विषयी महाधिवक्त्यांशी चर्चा झाली असे समजते.

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या परीक्षांसंदर्भातल्या निर्देशांवर कुलगुरुंनी  पाठवलेल्या पत्रानंतर राज्यपाल कोशियारी यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी सल्लामसलत केल्याचे समजते. राज्य सरकारने परीक्षा होणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अनुदान आयोगाने निर्देश दिले आहेत. दरम्यान, आज राज्यपालांनी याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजोय मेहता यांना बोलावले आहे.

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरुंनी या संदर्भात काढलेल्या उद्गारांची चित्रफीत जारी केल्याने शैक्षणिक वातावरण ढवळले आहे.कुलगुरुंनी या संदर्भात राज्यपालांना पत्र लिहिले असून कुलपती या न्यायाने आदेश देण्याची विनंती केली आहे. या तिढयातून मार्ग काढण्यासाठी कायदेशीर तरतुदी काय आहेत, परीक्षा घेण्याचा अधिकार कोणाचा या विषयी महाधिवक्त्यांशी चर्चा झाली असे समजते.

दरम्यान, महाराष्ट्रातील कुलगुरुंनी  कुलपती या नात्याने पदवीपरीक्षेसंबंधात लक्ष देण्याची विनंती केल्याने राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी काही भेटीगाठी सुरू केल्याचे समजते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे पत्र हे बंधनकारक आहे काय,  याबद्दल राज्यपालांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा केली आहे.

आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सल्लागार अजोय महेता आणि उच्चशिक्षण सचिव सौरभ विजय यांना राजभवनात बोलावण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी या संदर्भात संवाद व्हावा, यासाठी त्यांचे विश्वासू सहकारी  सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशीही राजभवनाने संपर्क केला आहे, असे समजते.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख