अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश फिरवला - Governor has stated that cancellation of examinations would jeopardize the future of students | Politics Marathi News - Sarkarnama

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश फिरवला

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 जून 2020

 अनेक विद्यापीठांमध्ये पदवीचे अंतिम वर्ष हे स्पेशलायझेशनचे असते. पहिल्या व दुस-या वर्षामध्ये सर्वच विषयांचा समावेश असतो. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आवडीच्या विषयांतील गुणांपेक्षा पहिल्या व दुस-या वर्षातील गुणांवरच पदवी दिली जाईल. हे योग्य होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल असे कळविले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल असे त्यांनी म्हटले आहे. राज्यपालांच्या या निर्णय़ामुळे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारने आधी झालेल्या परीक्षांतील गुणांच्या सरासरीच्या आधारे अंतिम गुणपत्रक देण्याचा निर्णय घेतला होता. उच्चशिक्षणंत्री उदय सामंत त्यासाठी आग्रही होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत कुलगुरूंशी चर्चा करून विद्यार्थ्यांना कोरोनाच्या संकटाच्या काळात परीक्षेतून सवलत देण्याची घोषणा केली होती. 

या निर्णयाला भाजपने विरोध केला होता.  सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन झाला का? तरुणांच्या माथी 'जळीत बीए" प्रमाणे 'कोरोना ग्रॅज्युएट' बिरुदावली लागणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात अशा भयगंड निर्माण केलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधीत भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज राजभवनवर जाऊन कुलपती राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सायंकाळी राज्यपालांनी आपली भूमिका राज्य सरकराला कळवली. राज्यपाल हे सर्व विद्यापीठांचे कुलगुरू असल्याने त्यांच्या भूमिकेवरच निर्णय ठरेल, असे स्पष्ट झाले आहे.  

'राज्यातील सर्व विद्यापीठ मिळून ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे काय? त्यांना प्रथम व व्दितीय वर्षात ATKT असल्याने त्यांना नापास करणार का? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. तसेच पूर्वी एका विद्यापीठाच्या उत्तर पत्रीका असलेल्या खोलीला आग लागल्याने त्यावर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांच्या शैक्षणिक करिअरला 'जळीत बीए" अशी बिरुदावली लागली. तशी बिरुदावली आता "कोरोना ग्रॅज्युएट" म्हणून लागणार का? विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाचा विचार होणे आवश्यक आहे. यासाठी आज आपण राज्यपालांची भेट घेतल्याचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले.

विद्यार्थी भयभीत
पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांनी घेरले असून ते आपल्या शैक्षणिक करिअरबाबत भयभीत आहेत. त्यामुळे मा.कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची योग्यवेळी दखल घेऊन त्यांना चिंतामुक्त करावे, अशी विनंती करण्यासाठी आपण राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना भेटलो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान काल मुख्यमंत्री आणि आज राज्यपालांना दिलेल्या निवेदनात आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केलेले प्रश्न खालीलप्रमाणे

•    राज्यातील विद्यापीठांमध्ये ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार? ATKT चे विद्यार्थी हे नापास गृहीत धरले जातील. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे याचा विचार केला आहे का? राज्यात सर्व विद्यापीठ मिळून 40 टक्के विद्यार्थी हे ATKT असलेले आहेत.
•    अनेक विद्यापीठांमध्ये पदवीचे अंतिम वर्ष हे स्पेशलायझेशनचे असते. पहिल्या व दुस-या वर्षामध्ये सर्वच विषयांचा समावेश असतो. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आवडीच्या विषयांतील गुणांपेक्षा पहिल्या व दुस-या वर्षातील गुणांवरच पदवी दिली जाईल. हे योग्य होईल का?
•    जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये इंजिनीयरिंग, फार्मसी व अॅग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणा-या प्रवेश परीक्षांबाबत धोरण काय? याही प्रवेश परीक्षा रद्द करणार काय? (लॉ, बी.एड. प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.) 
•    हा निर्णय पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकणा-या विद्यार्थ्यांना सुध्दा लागू आहे का?
•    अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत कुलगुरुंच्या समितीने परीक्षा घेणे शक्य नाही असे म्हटले होते काय?
•    काही विद्यापीठांमध्ये पहिल्या व दुस-या वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेतल्या जातात. अंतिम वर्षांच्या दोन सेमिस्टरच्या परीक्षा हे विद्यापीठ घेते. त्यामुळे महाविद्यालयीन परीक्षेच्या गुणांवरच कदाचित विद्यार्थ्याला पदवी मिळेल.
•    पुढील शैक्षणिक वर्ष पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट) अभ्यासक्रम कधी सुरु होणार?
•    जर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये गुण सुधारणेसाठी (Class Improvement) परीक्षा देणार असतील तर या गुण सुधारणेचा विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी फायदा होणार का? देशातील अन्य विद्यापीठांचे पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम तोपर्यंत सुरु झाले असतील तर या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.
•    जर Class Improvement च्या गुणांचा फायदा विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर शैक्षणिक वर्ष डिसेंबर किंवा जानेवारीत सुरु करणार काय?
•    मागील वर्षाच्या सरासरी गुणांवर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीला विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता देणार काय?
•    राज्याबाहेरील विद्यापीठांमध्ये तसेच परदेशातील विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्या संधी नाकारल्या जाणार नाहीत ना? याचा विचार केला आहे का?
•    बार कौन्सिल ऑफ इंडिया, फार्मसी कौन्सिल, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरसारख्या पार्लमेंट अॅक्टने स्थापन झालेल्या शिखर संस्था विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी लागणारा परवाना देतील काय?
•    बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच नामांकित फर्ममध्ये तसेच समाजामध्ये सरासरी गुणांमुळे विद्यार्थ्यांकडे वेगळ्या नजरेने (कोरोना पदवी) पाहिले जाईल काय?
•    विद्यापीठाच्या स्वायत्ततेमध्ये हा सरकारी हस्तक्षेप नाही काय? 
•    विद्यापीठातील सर्व शैक्षणिक घटकांनी एकत्रित विचार करुन निर्णय घेणे योग्य ठरले नसते काय?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख