विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण? संग्राम थोपटे की पृथ्वीराज चव्हाण? - Sangram Thopte Name for Maharashtra Assembly Chairman Post | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण? संग्राम थोपटे की पृथ्वीराज चव्हाण?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू झाल्या असून, हे पद कॉंग्रेसकडेच राहणार असे सांगितले जाते. संग्राम थोपटे, के. सी. पाडवी यांची नावे या पदासाठी दिल्लीत चर्चेत असताना शिवसेनेला पृथ्वीराज चव्हाण यांची या पदावर निवड व्हावी, असे वाटते.

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू झाल्या असून, हे पद कॉंग्रेसकडेच राहणार असे सांगितले जाते. संग्राम थोपटे, के. सी. पाडवी यांची नावे या पदासाठी दिल्लीत चर्चेत असताना शिवसेनेला पृथ्वीराज चव्हाण यांची या पदावर निवड व्हावी, असे वाटते. या पदाला न्याय देण्याची क्षमता पृथ्वीराज चव्हाणांमध्ये असून, त्यांचे नाव समोर येणे योग्य ठरेल, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. 

तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार असताना विधानसभेचे अध्यक्षपद ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. या पदावर कुणाची निवड व्हावी, हे ठरवण्यासाठी २५ फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. उपाध्यक्षपदी नरहरी झिरवळ यांची निवड झाली असल्याने ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यभार उचलू शकत आहेत; मात्र अधिवेशन होणार काय, ते किती काळ चालणार यासंबंधीचा निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीत होणार आहे.

आम्ही वेगळेच लढणार!
दरम्यान, कॉंग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांत आम्ही स्वतंत्रपणे लढू. कार्यकर्त्यांना त्यांचे बळ अजमावून पाहण्यासाठी संधी देणे आवश्‍यक असल्याचे मत कॉंग्रेसनेते व्यक्त करीत आहेत. उद्या कॉंग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर होणारी संसदीय मंडळाची ही पहिलीच बैठक आहे.

प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड जरी जाहीर झाले, तरी त्यांचे रिक्त होणारे पद मिळविण्यासाठी कॉंग्रेस पक्षात तीव्र स्पर्धा बघायला मिळत आहे. या पदासाठी थोपटे यांच्यासह परभणीचे आमदार सुरेश वडपूरकर, मुंबईचे आमदार अमिन पटेल यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर पुण्यातून कॉंग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांचे नाव चर्चेत होते. त्यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, जिल्ह्यातील काहींकडून त्यावेळी त्यांच्या मंत्रिपदाला विरोध झाल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे आतातरी आपल्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा थोपटे यांची आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख