Nilesh Rane criticizes Aditya Thackeray | Sarkarnama

नीलेश राणे अदित्य ठाकरेंवर घसरले; म्हणाले, "हे तर बालिश बुद्धीचे' 

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 18 मे 2020

कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू असताना मोबाईलमध्ये व्यस्त असलेले आदित्य ठाकरे यांना प्रोटोकॉल कळत नाही. त्यांना प्रोटोकॉल कुणीतरी समजावून सांगा, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

पुणे : कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू असताना मोबाईलमध्ये व्यस्त असलेले आदित्य ठाकरे यांना प्रोटोकॉल कळत नाही. त्यांना प्रोटोकॉल कुणीतरी समजावून सांगा, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. यांना कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य नाही, बालिश बुद्धीचे आहेत, अशा शब्दांत राणे यांनी ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. आमदार रोहीत पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी दुसरे ट्विट करून आदित्य ठाकरे यांनाही लक्ष केले आहे. 

राज्यातील साखर उद्योगासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केलेली मागणी. त्यावर राणे यांनी केलेले ट्विट. त्याला रोहीत पवार यांनी दिलेले उत्तर आणि त्यावर एकेरीवर येत राणे यांनी पुन्हा दिलेले उत्तर या साऱ्या चर्चात आदित्य ठाकरे यांच्यावरही नीलेश राणे यांनी एकेरीवर येत टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोनाच्या संदर्भात बैठक सुरू असताना मंत्री असलेले आदित्य ठाकरे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. त्यांना बैठकीचा प्राटोकॉल कळत नसेल तर कुणीतरी समजावून सांगा, असे राणे यांनी म्हटले आहे. आदित्य यांना कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य नाही. शेवटी बालिश बुद्धी असल्याचे त्यांनी परत एकदा सिद्ध केल्याचे राणे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

राजकीय विषय व त्यासंदर्भाने राजकीय व्यक्तीवर जहरी टीका करणारी ट्विट नीलेश राणे वारंवार करीत असतात. शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांचा मुख्य रोख असतो. शिवसेनेच्या या नेत्यांवर टीका करताना त्यांची भाषा बऱ्याचवेळा एकेरी असते. मात्र, खूप दिवसांनी त्यांनी आमदार रोहीत पवार यांनाही लक्ष्य केले आहे. राणे यांच्या ट्विटला उत्तर देताना आमदार पवार यांनी बोचरी टीका केल्याने राणे यांनी त्यांच्यावर तिखट शब्दांत प्रतिहल्ला केला होता. त्यावर दोन दिवस चांगलेच ट्विटवॉर रंगले आहे.

आमदार रोहीत पवार व नीलेश राणे यांच्या समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीवरून त्यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केल्याने यात आणखी भर पडली आहे. आदित्य ठाकरे यांच्यावरील टिकेला उत्तर देताना ठाकरे यांच्या समर्थकाने राणे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला आहे. बैठकीत असले तरी लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ते मोबाईल वापरतात. तुमच्यासारखे रिकामटेकडे नाहीत, अशा प्रकारची प्रतिउत्तरे ट्विटवर देण्यात आली आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख