MNS Leader Sandip Deshpande Questions Sanjay Raut | Sarkarnama

'ठाकरे ब्रँड' आजच कसा आठवला? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

'ठाकरे' हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा 'ब्रॅण्ड' पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच  'ब्रॅण्ड' चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे, या संजय राऊत यांच्या विधानावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे

मुंबई : महाराष्ट्रात 'ठाकरे' ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी 'ठाकरे' ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'तून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. त्यावर आमची आठवण आताच का आली? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. 

'ठाकरे' हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा 'ब्रॅण्ड' पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच  'ब्रॅण्ड' चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात 'ठाकरे' ब्रॅण्डचा जोर असायला हवा, असे राऊत यांनी 'सामना'मधील रोखठोक सदरात म्हटले आहे. त्यावर "जेव्हा आम्ही या स्वाभिमानाविषयी बोलत होतो तेव्हा आम्हाला एकटं पाडलं आणि आता पवार आणि ठाकरे हा ब्रँड आठवला कसा, हा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला.''

''महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. हे ग्रहण 'उपरे' लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्य़ा एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख 'बाबर' असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रात भाजप उभा राहतो हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे,'' असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर आता मनसेचे नेते कडवट प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख