'यिन' अधिवेशनात तरुणाईने महाराष्ट्राच्या समृद्धीचे वैचारीक मंथन!

यिन अधिवेशनात राज्‍यभरातील शॅडो कॅबिनेटचे मंत्री, पालकमंत्री यांनी हजेरी लावतांना खर्या अर्थाने वैचारीक मंथन घडविले. शैक्षणिक प्रश्‍नांपासून तर महिलांचे सक्षमीकरण कोरोना महामारींना तोंड देण्यासाठी सक्षम आरोग्‍य व्‍यवस्‍था यांसह विविध विषयांवर सर्वसमावेशक चर्चा झाली.
YIN 3
YIN 3

नाशिक : यिन अधिवेशनात राज्‍यभरातील शॅडो कॅबिनेटचे मंत्री, पालकमंत्री यांनी हजेरी लावतांना खर्या अर्थाने वैचारीक मंथन घडविले. (Shadow cabinet discuss on various issues of Maharashtra`s Prosperity) शैक्षणिक प्रश्‍नांपासून (Education Issues) तर महिलांचे सक्षमीकरण (womens empowerment), कोरोना (Covid19) महामारींना तोंड देण्यासाठी सक्षम आरोग्‍य व्‍यवस्‍था (Health infrastructure) यांसह विविध विषयांवर सर्वसमावेशक चर्चा झाली. महाराष्ट्राला समृद्ध (Prosperity of Maharashtra) बनविण्याची, नेतृत्‍वाची धडपड प्रतिनिधींमध्ये दिसून आली. 

या अधिवेशनात विभागनिहाय यिन मंत्र्यांनी ठराव मांडले. प्रारंभी 'यिन'चे मुख्यमंत्री अजय खांडबहाले यांनी अधिवेशनात पहिला ठराव मांडला. त्‍यांनी कृषि, शिक्षण, महिला व बालकल्‍याण, नगरविकास अशा विविध विभागातील ठरावांचा समावेश होता. नेहमीच शेतकरी वर्ग उपेक्षित राहिलेला असून, त्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळावा. आपल्‍या अन्नदात्‍याला उभारी देण्याचे, त्‍याला खंबीरपणे उभे करण्याचे व स्‍वावलंबी वनवण्याचे काम यापुढील काळात करण्याबाबतचा ठराव मांडला. कोरोना महामारीत शैक्षणिक क्षेत्रदेखील प्रभावित झालेले आहे. अनाथ झालेले मुले, दुष्काळग्रस्‍त भागातील विद्यार्थ्यांना शुल्‍क माफीसह अन्‍य सवलतींबाबत पाठपुरावा करण्याचा ठराव मांडला. महिला व बालकल्‍याण विभागातील ग्राम सखी या नावाने पदनिर्मिती करत गृहोद्योग, महिला बचतगट, व महिला संस्‍थांना बळ देण्याच्‍या ठरावासह नगरविकास विभागाचाही ठराव त्‍यांनी माडला. या ठरावांना `यिन`च्या नाशिकच्या पालकमंत्री संध्या गव्‍हाणे यांनी अनुमोनदन दिले. तर श्रद्धा मेठे, आनंद ढोपरे, संजीवनी मठपती यांनी समर्थन दर्शविले.

शाश्‍वत विकासाची गरज : पाटील
`यिन`चे उपमुख्यमंत्री विशाल पाटील यांनी दुसरा ठराव मांडला. राज्‍यभरातील रस्ते खड्डेमुक्‍त झाले पाहिजे. यासंदर्भात प्रशासनाचा पाठपुरावा करु. चांगल्‍या रस्‍त्‍यांसोबत स्‍वच्‍छतागृह, पाणपोई व अन्‍य सुविधा ठराविक अंतरावर उपलब्‍ध असाव्‍यात, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. दुतरफा वृक्षलागवड असावी, असे सांगतांना हाती घेतलेल्‍या वृक्षारोपण कार्यक्रमाची माहिती सभागृहास दिली. राज्‍याचा शाश्‍वत विकास होण्याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. ठरावास `यिन`चे कोल्‍हापूर पालकमंत्री पार्थ देसाई यांनी अनुमोदन दिले. काजल औटी, प्रियांका जगदाळे व यश देवधर यांनी समर्थन दर्शविले.

मुलींच्‍या विवाहाचे वय २१ असावे
मुलींचे लग्‍नाची वयोमर्यादा वाढवून २१ वर्ष करण्याचा ठराव महिला व बाल विकास मंत्री सृष्टी मोरे यांनी मांडला. मुलींना लग्‍नाच्‍या बेडीत न अडकविता, त्‍यांनाही त्‍यांचे करीअर घडविण्याची संधी देणे अपेक्षित असल्‍याचे सांगितले. बाल विवाहाच्‍या मुद्यावरही चर्चा घडविली. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींना स्‍वयंसंरक्षणाचे प्रशिक्षण असावे. महिलांवरील वाढत्‍या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांच्‍या संदर्भात सुविध सूचना मांडल्‍या. ठरावास `यिन`चे पुण्याचे पालकमंत्री सम्‍मेद कालभावी यांनी अनुमोदन दिले. विकास घाटोळ, कोमल अडेवार, अतुल झोड यांनी समर्थन दिले.

तरुणांनी व्‍यवसायाकडे वळावे
एमआयडीसीचा विकास, उद्योग व्‍यवसायांना चालना द्यावी. युवकांनी उद्योग व्‍यवसायाकडे वळतांना अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्याची आवश्‍यकता नागपूर येथील `यिन`चे नगरविकास व्‍यवस्‍थापन विनोद हजारे यांनी व्‍यक्‍त्‍ केली. ठरावाला `यिन`चे नागपूरच्‍या पालकमंत्री ज्ञानवंत शेंडे यांनी अनुमोदन तर साक्षी जाधव, आदित्‍य पंडित, करण राठोड यांनी समर्थन दिले.

आरोग्‍य व्‍यवस्‍था सुदृढ करु
`यिन`चे आरोग्‍य मंत्री आकाश हिरवळे यांनी मिशन ३६ यांनी माहिती दिली. कोरोना महामारीच्‍या संभाव्‍य तिसर्या लाटेचा सामना करतांना आरोग्‍य व्‍यवस्‍था सज्‍ज ठेवणे. लसीकरणाची गती वाढविण्याबाबत ठराव मांडला. थॅलेसिमिया रुग्‍णांचा प्रश्‍न मांडला. नाझमीन शेख यांनी ठरावास अनुमोदन दिले. श्रद्धा खोरगडे, प्रतिक्षा कदम, प्रभात पाटील यांनी समर्थन दिले.

शेतीला मत्‍स्‍य व्‍यवसायाची जोड
किनारपट्टीवरील शेतकर्यांना शेतीला पुरक व्‍यवसाय म्‍हणून मत्‍स्‍य व्‍यवसाय करण्याची संधी आहे. त्‍यासाठी मत्‍स्‍य व्‍यावसायिकांना लोकल टु ग्‍लोबल करण्याबाबत आगामी काळात काम करायचे आहे. राज्‍यातील किल्‍यांचे संवर्धन झाले पाहिजे व पर्यटनाला चालना द्यायला हवी, असे मत्‍स्‍य व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन व पर्यावरण विभागाचे `यिन`चे मंत्री मॅकविन फर्नांडिस म्‍हणाले. ठरावाला `यिन`च्या सिंधुदुर्गच्‍या पालकमंत्री ऋतुजा पाटील यांनी अनुमोदन दिले. प्राजक्‍ता माळी, मनिष मुसळे, ज्ञानेश्‍वरी भालेराव यांनी समर्थन दिले.


विदर्भ, मराठवाड्याच्‍या सर्वांगिण विकासाच्‍या अनुषंगाने अपेक्षित बाबींवर `यिन`चे खनिज कर्म व्‍यवस्‍थापन विभागाचे अनिकेत दुर्गे यांनी प्रकाशझोत टाकला. राज्‍यातील ९७ टक्‍के खनिज संपत्ती विदर्भात आहे. परंतु राज्‍याच्‍या अन्‍य भागांच्‍या विकासाच्‍या तुलनेत मराठावाडा, विदर्भ भागाचा अपेक्षित विकास झालेला नाही. यासंदर्भात युवा व्‍यासपीठाच्‍या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी केला. ठरावाला अनुमोदन `यिन`चे चंद्रपूरच्या पालकमंत्री अंकिता देशपट्टीवार यांनी दिले. समर्थन गौरव वाळींबे, प्रणव वाडगे, प्रविण कोपर्डे यांनी दिले.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com