मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला संबोधित करताना काही निर्बंध जारी केले आहेत. राज्यातले सर्व राजकीय, सामाजिक व सरकारी कार्यक्रम २८ मार्चपर्यंत रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एक मार्च पर्यंत आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 22, 2021
राजकीय, धार्मिक आणि सामजिक कार्यांना राज्यात काही दिवस बंदी असणार आहे. यात मिरवणुका, मोर्चे, आंदोलन, यात्रा आदींचा समावेश असणार आहे. तसेच, लॉकडाउन करायचा का? या प्रश्नाचे उत्तर येत्या आठ दिवसांत जनतेकडूनच घेणार आहे. ज्यांना लॉकडाउन हवे असेल ते विना मास्कचे फिरतील आणि ज्यांना लॉकडाउन नको आहेत, ते मास्क घालून सर्व नियमांचे पालन करतील, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसाठी जनतेलाच आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
दरम्यान, राज्यभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने आज (ता. २२) वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये होणारा उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा 'उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@' हा कार्यक्रम रद्द केला आहे. आपण हा कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती सामंत यांनी ट्विट करून दिली. मागील आठवडाभरात मुंबई परिसरातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आल्याने वरळी येथील कार्यक्रमाला मुंबई आणि एसएनडीटी विद्यापीठातून विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता.त्यामुळे वरळी येथे होणाऱ्या या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच हा कार्यक्रम रद्द केला जावा, अशी मागणीही केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलेले आवाहन लक्षात घेऊन सामंत यांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Edited By - Amit Golwalkar

