जावयाचे आगमन संजय राऊतांमागील ईडीची पिडा हटवणार काय? - Sanjay Raut's daughter's Engagement ceremoney in Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

जावयाचे आगमन संजय राऊतांमागील ईडीची पिडा हटवणार काय?

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 31 जानेवारी 2021

त्यांची कन्या पूर्वेशी हिचा साखरपुडा मल्हार नार्वेकर यांच्याशी रविवारी (ता. 31 जानेवारी) झाला. 

मुंबई : शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते व "सामना'चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबात आता जावयाचे आगमन झाले आहे. त्यांची कन्या पूर्वेशी हिचा साखरपुडा मल्हार नार्वेकर यांच्याशी रविवारी (ता. 31 जानेवारी) झाला. 

जावयाचे वर्णन जामातो दशमो ग्रहः असे केले जाते. भारतीय राजकारणातदेखील अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक जावयांनी आपल्या सासऱ्याला आणि सासूलाही अडचणीत आणल्याची उदाहरणे आहेत. त्याचमुळे नवग्रहांबरोबरच जावई हा सासऱ्याच्या राशीला लागलेला दहावा ग्रह असतो, असेही गंमतीत म्हटले जाते. एरवी आपल्या "संजया'च्या दिव्यदृष्टीने राजकारणात अचूक डावपेच रचणारे, मर्मभेदक वक्तव्ये आणि मार्मिक लेखाबद्दल प्रसिद्ध असणारे संजय राऊत यांना सध्या "ईडी'च्या पिडेने ग्रासले आहेत. अशा स्थितीत या दहाव्या ग्रहाच्या आगमनामुळे त्यांच्यामागची ही पिडा जाईल का, अशी गमतीदार चर्चाही आता सुरु झाली आहे. 

आज येथील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलात दोन्हीकडच्या मर्यादित कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा साखरपुडा झाला. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे हजर होत्या. त्यानंतर संध्याकाळी रिसेप्शनला सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांनी तसेच राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी हजेरी लावली होती. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या साह्याने शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस ही न भूतो अशी युती घडवून आणणारे राऊत यानिमित्ताने काही नव्या ग्रहांची युती घडवून आणतील का? अशीही खुमासदार चर्चा यानिमित्ताने झाली. 

मल्हार हे आयटी अभियंते असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय असल्याचे सांगितले जाते, तर पूर्वेशी या चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करीत आहेत. मल्हार यांचे वडील राजेश नार्वेकर हे वरिष्ठ सनदी अधिकारी असून ते सध्या ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. ते दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सहसचिव होते. त्यापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात, तसेच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

रायगड जिल्हा हागणदरीमुक्त करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. रत्नागिरी जिल्ह्यात काम करताना त्यांनी स्वच्छ भारत व पंतप्रधान आवास योजना राबवल्या होत्या. ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना कोरोनाचा फैलाव होऊ नये; म्हणून त्यांनी काही कठोर उपाय योजना राबविल्या होत्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख