राहुल गांधींचा वाढदिवस “सेवा सप्ताह" ने साजरा करणार : सत्यजीत तांबे - Rahul Gandhi's birthday will be celebrated with "Service Week": Satyajit Tambe | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधींचा वाढदिवस “सेवा सप्ताह" ने साजरा करणार : सत्यजीत तांबे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 जून 2020

युवक कॉंग्रेस मनरेगा अंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा घेऊन कामगारांच्या काही समस्या असल्यास सोडवणार आहे.

मुंबई : अ.भा. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने 19 ते 25 जून दरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन केले असल्याची माहिती युवकचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज दिली. 

राज्यावर कोरोनाचे जसे संकट आहे तसेच निसर्ग वादळामुळे कोकणसह राज्याला तडाखा बसला आहे. संकटामुळे जनतेचे जगणे सुसह्य करण्यासाठी अशा सप्ताहाचे आयोजन करण्यामागचा उद्देश आहे. या सप्ताहअंतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तांबे यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की  देशातील एका संवेदनशील नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी, लोकांची सेवा करणे आणि #कोरोना मध्ये आपली काळजी घेणाऱ्या लोकांचा सन्मान करणे यापेक्षा उत्तम मार्गच असू शकत नाही. महाराष्ट्र युवक कॉंग्रेस, राहुल गांधींचा वाढदिवस “सेवा सप्ताह" ने साजरा करणार आहे.

लॉकडाऊन जरी अंशतः खुलला असला तरी रोजगार अद्याप पूर्णपणे सुरू झाला नसल्याने गरिबांची आणि विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाची उपासमार होत आहे. यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घेत गरजूंसाठी अन्नधान्य आणि इतर आवश्‍यक वस्तूंच्या "न्याय किट'चे वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

तसेच युवक कॉंग्रेस मनरेगा अंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा घेऊन कामगारांच्या काही समस्या असल्यास सोडवणार आहे. सोबतच नवीन कामगारांना जॉब कार्ड मिळवून देऊन त्यांना रोजगार मिळवून देणार आहे. 

कोरोना योद्‌ध्यांचा सत्कार 
कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग, पोलिस खाते आणि पालिकेचे विविध विभागाचे कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून जनतेचे कोरोनापासून रक्षण केले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युवक कॉंग्रेस राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यामध्ये कोरोना योद्‌ध्यांचा सत्कार करणार आहे. सर्व कार्यक्रम"सेवा सप्ताहा'अंतर्गत राबविण्यात येणार आहे.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख