किरीट सोमय्यांना केंद्राची सुरक्षा पुरवा : राज्य भाजपची मागणी  - Provide central security to Kirit Somaiya: BJP's demand to central government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

किरीट सोमय्यांना केंद्राची सुरक्षा पुरवा : राज्य भाजपची मागणी 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 11 जानेवारी 2021

शिवसेना नेत्यांवर कागदपत्रांसह आरोप करत आहेत.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवार यांच्याविरोधात आरोपांची राळ उठविणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारची सुरक्षा पुरवावी, अशी मागणी राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. 

माजी खासदार सोमय्या हे गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे परिवारासह शिवसेना नेत्यांवर कागदपत्रांसह आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांना धोका असल्याने सुरक्षा पुरवण्याची मागणी भाजपच्या वतीने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. राज्यातील भाजप नेत्यांची सुरक्षा कमी केल्याने भाजप नेत्यांनी थेट केंद्राकडे ही मागणी केली आहे. 

किरीट सोमय्यांना घेरण्याची शिवसेनेची रणनीती 

भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सातत्याने चालवलेल्या आरोपांमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला अकारण तडा बसतो आहे. सोमय्या शांत होणार नाहीत, हे गृहित धरत आता त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा लावण्याची चाचपणी शिवसेनेने सुरू केली आहे. 

कोणतीही बेलगाम विधाने करता आहात, ती सिद्ध करा; अन्यथा माफी मागा, असा दावा ठोकण्याचा शिवसेना नेत्यांचा विचार आहे. मानहानीचे दावे वर्षानुवर्षे सुरु असतात. नंतर ते विस्मृतीत जातात, त्यामुळे हा कालापव्यय टाळण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा, अशी विनंती न्यायालयाला करता येईल काय? ही शक्‍यताही तपासून पाहिली जात आहे. शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांनी या संदर्भात ठाकरे परिवाराशी चर्चा केली आहे. 

पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात अंतिम निर्णय सांगतील अन त्यानुसार दाव्याची तयारी केली जाईल, असे एका उच्चपदस्थ नेत्याने सांगितले. या संदर्भात उच्च व सर्वोच्च न्यायालयातील नामवंत वकिलांशी सल्लामसलत करण्यात येत आहे. 

सोमय्या यांनी रश्‍मी ठाकरे यांच्या अलिबाग येथील घराबाबत जे आरोप केले आहेत, त्यात तथ्य नाही, असे सांगण्यात येत आहे. ते प्राप्तीकर विवरणासारख्या काही महत्वाच्या कागदपत्रात नमूद केले असल्याचेही सांगण्यात येते आहे. 

वर्षपूर्तीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थिरस्थावर झाल्याने आता प्रतिमासंवर्धनाकडे लक्ष देण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. थेट उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबीयांवर दररोज होणारे आरोप जनतेच्या मनात किंतू निर्माण करतात, असे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांनी त्यांना सांगितले. ग्रामपंचायत निवडणुका सुरु आहेत अन महापालिका निवडणुका येऊ घातल्या असल्याने आता भाजपला अपप्रचाराची संधी मिळू देता कामा नये, असे एका मंत्र्याने सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख