प्रथम क्वारंटाईन व्हा, नंतर गावात जा;  भास्कर जाधव यांचे चाकरमान्यांना आवाहन

'तुम्हाला तुमच्या गावात आणण्यात मी यशस्वी झालो. याचे मला समाधान आहे. गाव तुमचे, गावातील माणसेही तुमची. पण क्वारंटाईन व्हा नंतर गावात जा. हे तुमच्या आणि गावच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचे आहे,'' असे आवाहन आमदार जाधव यांनी गुहागरात येणार्‍या चाकरमान्यांना मार्गताम्हाने येथील चेकपोस्टवर केले.
MLA Bhaskar Jadhav made Arrangements for Konkan Residents coming from Mumbai
MLA Bhaskar Jadhav made Arrangements for Konkan Residents coming from Mumbai

चिपळूण : 'तुम्हाला तुमच्या गावात आणण्यात मी यशस्वी झालो. याचे मला समाधान आहे. गाव तुमचे, गावातील माणसेही तुमची. पण क्वारंटाईन व्हा नंतर गावात जा. हे तुमच्या आणि गावच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचे आहे,'' असे आवाहन आमदार जाधव यांनी गुहागरात येणार्‍या चाकरमान्यांना मार्गताम्हाने येथील चेकपोस्टवर केले. 

चेकपोस्टवरील शासकीय कर्मचारी आणि चाकरमान्यांची कोणतीही गैरसुविधा होणार नाही याची काळजी आमदार जाधव यांनी घेतली. चाकरमान्यांचे स्वागत करताना त्यांना बाटलीबंद पाणीही पुरविले. कोकणातील चाकरमान्यांना त्यांच्या गावात जाण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी सुरवातीपासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर कोकणात चाकरमानी येण्यास सुरवात झाली आहे. 

गुहागरमध्ये येणार्‍या चाकरमान्यांची नोंद घेण्यासाठी मार्गताम्हाने येथे चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. आमदार जाधव यांनी आज सकाळी या चेकपोस्टला भेट दिली. सकाळी चेकपोस्टपासून काही अंतरावर चाकरमान्यांच्या शेकडो वाहनांची रांग लागली होती. कुटुंबातील एक सदस्य नोंदीसाठी उन्हात रांगेत उभा होता. उर्वरित चाकरमानी गाडीत आणि मिळेल तेथे सावली शोधून बसले होते. 

त्यांच्यासह चेकपोस्टवरील कर्मचार्‍यांची होणारी गैरसोय आमदार जाधव यांच्या लक्षात आली. लांबचा प्रवास करून आलेल्या चाकरमान्यांना प्राथमिक विधी करता यावेत यासाठी त्यांनी पुरूष आणि महिलांसाठी ग्रीननेटच्या माध्यमातून स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था केली. अर्ध्या तासात बाटलीबंद पाण्याचे 250 हून अधिक बॉक्स त्यांनी चेकपोस्टवर मागवले. प्रत्येकाला पाण्याची बाटली देवून आमदार जाधव यांनी चाकरमान्यांची तहान भागवली. 

शिवसैनिकांना केले मदतीचे आवाहन 

वयोवृद्ध, लहान मुले, गरोदर माता कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी शासकीय कर्मचार्‍यांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. शुगर किंवा इतर आजार असलेल्या चाकरमान्यांच्या मदतीला प्रथम धावा असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

भास्कर जाधव हेच माझे पास

काहींना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या ई पासमध्ये अनेक चुका होत्या त्यामुळे चेकपोस्टवर शासकीय कर्मचारी चाकरमान्यांची अडवणूक करायचे. चाकरमानी आमदार जाधव यांना फोन करून आपली अडचण सांगायचे. त्यानंतर आमदार जाधव चेकपोस्टवरील कर्मचार्‍यांना सोडण्याची सूचना करायचे. अशा प्रकारे काहींनी जिल्ह्यात प्रवेश केला. यातीलच एक रामपूर येथील सुरेंद्र चव्हाण पासाशिवाय पुण्याहून गुहागरला आले. मार्गताम्हाने येथील चेकपोस्टवर त्यांच्याकडे पासची मागणी करण्यात आली तेव्हा भास्कर जाधव हेच माझ्यासाठी पास असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय कर्मचार्‍यांनी चव्हाण यांची माहिती घेवून त्यांना क्वारंटाईन होण्यासाठी टोकन दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com