पूजा चव्हाण आत्महत्या : त्या ऑडिओ क्‍लिप्सची चौकशी करा  - Investigate That audio clips of the Pooja Chavan suicide case: Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

पूजा चव्हाण आत्महत्या : त्या ऑडिओ क्‍लिप्सची चौकशी करा 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

अशा एकूण 12 ऑडिओ क्‍लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाज माध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्‍लिप्ससुद्धा सर्वत्र फिरत आहेत.

या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे. 

पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात फडणवीस यांनी म्हटले आहे की, पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणातील काही ऑडिओ क्‍लिप्ससुद्धा समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशा एकूण 12 ऑडिओ क्‍लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.

आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्‍लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्‍लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत, त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय, त्यातून पूजा चव्हाण हिची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 

एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप त्यामुळे बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्‍लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे.

ही चौकशी तत्काळ करून तरुणीला न्याय मिळवून द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही फडणवीस यांनी या पत्राद्वारे पोलिस महासंचालकांकडे केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख