माझ्या हिंदूत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही - उद्धव ठाकरेंचा राज्यपालांना चिमटा - I Dont need Hindutva Certificate from you Uddhav Thackeray to Governor | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्या हिंदूत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही - उद्धव ठाकरेंचा राज्यपालांना चिमटा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

काल राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत पत्र लिहून विचारणा केली होती. 'तुम्ही तुमचे हिंदुत्व विसरलात की पूर्वी नावडता असलेला 'सेक्युलर' शब्द अचानक आवडायला लागला, असा खोचक सवाल राज्यपालांनी या पत्रात विचारला होता.

मुंबई : राज्यातली प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नवा वाद पेटला आहे. मंदीरे उघडण्याबाबत राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी तेवढ्याच कडक भाषेत उत्तर दिले आहे.

काल राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत पत्र लिहून विचारणा केली होती. 'तुम्ही तुमचे हिंदुत्व विसरलात की पूर्वी नावडता असलेला 'सेक्युलर' शब्द अचानक आवडायला लागला, असा खोचक सवाल राज्यपालांनी या पत्रात विचारला होता. कोरोनाच्या संकटाशी लढताना तुम्हाला काही दैवी संकेत मिळतात का, अशीही विचारणा राज्यपालांनी केली होती. या सगळ्याला ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात उद्धव ठाकरे म्हणतात.....

माननीय राज्यपाल महोदय , महाराष्ट्र राज्य यांसी 

जय महाराष्ट्र,

महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ' हि मोहीम राबवली जात आहे.  

आरोग्यविषयी सुचना देणे,जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका  नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.

महोदय  आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही .

Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ  ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? 

मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.

आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख