कृष्णा हेगडेंचा भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश; मनसेला पुन्हा धक्का 

या दोघांचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.
Former MLA Krishna Hegde joins Shiv Sena
Former MLA Krishna Hegde joins Shiv Sena

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपी करणारी महिला रेणू शर्माच्या विरोधात तक्रार देऊन चर्चेत आलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विलेपार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शुक्रवारी (ता. 5 फेब्रुवारी) रात्री शिवसेनेत प्रवेश केला. तसेच, विलेपार्ले विधानसभेच्या 2019 निवडणुकीतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे ह्यांनीही भगवा हाती घेतला. या दोघांचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. 

ह्या प्रवेश प्रसंगी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब, युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई हेही उपस्थित होते. 

कृष्णा हेगडे कॉंग्रेस पक्षाचे पार्ले विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेचे विनायक राऊत यांना निवडणुकीत हरवलं होतं. काही वर्षांपूर्वी हेगडे यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, भाजपकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आज रात्री भाजपचा त्याग करत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. कृष्णा हेगडे हे मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे जावई आहेत. 

हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पार्ल्यातील संघटना बांधणीत मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, रेणू शर्मा नावाच्या महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यावेळी कृष्णा हेगडे हे संबंधित महिला आपल्याही ब्लॅकमेल करीत होती, असे म्हणत तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दिली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. 

मनसेला गळती सुरूच 

माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्याबरोबरच विलेपार्ले विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार जुईली शेंडे ह्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तत्पूर्वी डोंबविलीचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. डोंबिवलीत मनसेचा दुसरा महत्वाचा चेहरा असलेले मंदार हळबे यांनीही भाजपमध्ये जाणे पसंत केले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मनसेला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com