हे काळजीवाहू नव्हे तर मार्ग काढणारे सरकार : उद्धव ठाकरे - CM Uddhav Thackeray Addressed People for Mission Begin Again | Politics Marathi News - Sarkarnama

हे काळजीवाहू नव्हे तर मार्ग काढणारे सरकार : उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 जून 2020

लाॅकडाऊन  ५ ची मुदत ३० जूनला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी हे आवाहन केले. येत्या आषाढी एकादशीला मी वारकरी म्हणून आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.  

मुंबई : आमचे सरकार काळजीवाहू नाही. ज्या सरकारला स्वतःची काळजी असते ते सरकार काळजीवाहू असते. हे सरकार तुमचे आहे. तुमची काळजी करणारे आणि त्यातून मार्ग काढणारे हे सरकार आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.

राज्यात व्यवहार सुरु झाले असले तरीही धोका टळलेला नाही. फक्त इकडे आड तिकडे विहिर अशी आपली स्थिती झाली आहे, असे सांगत राज्यातील जनतेने सावधगिरी बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले. 

कोरोनाशी लढ्यात आपण प्लाझ्मा थेरपी वापरतो याची केंद्र आपण वाढवतो आहोत. आज कोरोनातून जे मुक्त झाले आहेत, त्यांनी पुढे येऊन 'प्लाझ्मा'दान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. लाॅकडाऊन  ५ ची मुदत ३० जूनला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी हे आवाहन केले. येत्या आषाढी एकादशीला मी वारकरी म्हणून आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.  

राज्यात व्यवहार सुरु करण्यासाठी 'मिशन बिगीन अगेन' सुरु आहे. राज्यात उद्योग सुरु झाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ''येत्या १ तारखेला डाॅक्टर्स डे आहे तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती आहे. तो आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. कोरोनाच्या काळात लढणारे डाॅक्टर आणि लाॅकडाऊनच्या काळात अन्न उत्पादन करणारा शेतकरी या दोघांनाही मी अभिवादन करतो,'' अकोल्यासारख्या काही ठिकाणी शेतकऱ्यांना बोगस बी-बियाणे दिल्याचे प्रकार घडले असून अशांवर कडक कारवाई केली जाईल, व ज्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही मिळवून देऊ, असेही ते म्हणाले.

कोरोनामुक्त झालेल्यांनी 'प्लाझ्मा' दानासाठी पुढे यावे

कोरोनाच्या उपचारांबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, "मार्चपासून सगळ्या शस्त्रांनीशी कोरोनाशी लढतो आहोत. आपला महाराष्ट्र उपचाराच्या बरोबरीने चाललो आहोत. चोहोबाजूला आपली नजर आहे. प्लाझ्मा थेरपी आपण मार्च एप्रील पासून सुरु केली आहे. उद्या कदाचित सर्वाधिक प्लाझ्मा थेरपी देणारे पहिले राज्य ठरेल. त्यासाठीची केंद्र आपण वाढवतो आहोत. आता जे कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांचे रक्त घेऊन प्लाझ्मा वापरला तर अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येतील. जे बरे झाले आहेत, त्यांनी पुढे येऊ प्लाझ्मा दान करावे,'' असे माझे आवाहन आहे.  

आषाढीला पंढरपूरला जाणारच

राज्यातल्या सर्वधर्मीयांचेही उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. सर्वांनी आपापले सण सरकारचे आवाहन मानून घरातच साजरे केले याबद्दल त्यांनी जनतेला धन्यवाद दिले. आषाढी वारीबाबत ते म्हणाले, "वारीची परंपरा सात-आठशे वर्षांची आहे.  २०१० साली मी पांडुरंगाचे दर्शन घेतले. प्रत्यक्ष सहभागी न होता हेलिकाॅप्टरमधून अथांग वारकऱ्यांच्या रुपात मी विश्वरुप पाहिले. ही परंपरा मोठी आहे. हे अप्रुप या देशातच घडू शकते. वारकऱ्यांनीही संयम दाखवला आहे.  मी आषाढी एकादशीला विठूरायाला साकडे घालायला जाणार आहे. हे तुझे भक्त घरात आहेत. चमत्कार अनेक ऐकले. पण आता हा चमत्कार दाखव. कोरोनाचं संकट नष्ट करुन जगाला चांगले दिवस दाखव हे साकडे मी घालणार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर तुमचा प्रतिनिधी म्हणून वारकरी म्हणून तिथे जाणार आहे,'' 

''मला दहीहंडी मंडळांनाही धन्यवाद द्यायचे आहे. त्यांनी स्वतःहून उत्सव रद्द केला आहे. आता गणेशोत्सव येतो आहे. मग नवरात्र, दिवाळी, माउंट मेरीची यात्रा हे सगळे उत्सव येणार आहेत. एक सामाजिक भान ठेऊन उत्सव साजरा करुयात. गणेशोत्सावत सर्वांनी संयम ठेवा व मूर्तीची उंची जास्तीत जास्त चार फूट ठेवा असे सांगितले आहे. कारण मूर्ती हलवतानाही जास्त लोक एकत्र येऊ नयेत हा माझा उद्देश आहे. आगमनाच्या मिरवणुका निघणार नाहीत, विसर्जनाच्या नाहीत. पण आपण एकत्र येऊन यातून मार्ग काढू. विघ्नहर्त्याच्या आशिर्वादाने महाराष्ट्र नक्की कोरोना मुक्त करु शकतो,'' असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख