मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर भाजपचा महापौर निवडून आणून मुंबईकरांना अकार्यक्षम सत्ताधाऱ्यांपासून आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती देऊ, अशी घोषणा या निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलेले भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी आज येथे केली.
मुंबई भाजप कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भातखळकर यांची महापालिका निवडणुकांसाठी पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या आखणीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिका निवडणुकीत स्वबळावर सर्वच्या सर्व म्हणजे २२७ जागा लढवण्याचेही पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर सत्तेवर येण्यात पक्ष यशस्वी ठरेल, असेही भातखळकर यांनी सांगितले. हे आव्हान पेलण्यासाठी पक्ष संघटनेला सज्ज करण्याचे काम पूर्ण क्षमतेने केले जाईल, असेही ते म्हणाले. या बैठकीला शहरातील पक्षाचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी हजर होते.
Edited By - Amit Golwalkar

