शिवसेना अन् ठाकरे घराण्याचा आधुनिक वारस - Aditya Thackeray Modern heir of Shiv Sena and Thackeray family | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

शिवसेना अन् ठाकरे घराण्याचा आधुनिक वारस

मृणालिनी नानिवडेकर
रविवार, 13 जून 2021

निवडणुकीच्या मैदानात उतरलेले पहिले ठाकरे ते हिंदुत्वाची साथ सोडून विचारप्रणालीपासून सेनेला दूर नेणारे ठाकरे.

मुंबई : विश्वाचे केंद्रस्थान सूर्य, तसेच शिवसेनेचा आजचा आणि उद्याचा केंद्रबिंदू आदित्य ठाकरे. आज त्यांचा वाढदिवस. महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचे, त्यामुळे तेथे सत्ताकेंद्रे खूप असणार हे ओघानेच आले. पण आजचे बहुचर्चित सत्ताकेंद्र म्हणजे आदित्य उद्धव रश्मी ठाकरे. आमदार त्यांच्या भोवती फिरतात, त्यांना सांगितलेले काम पूर्णत्वास जावे यासाठी मागेपुढे घोटाळतात. त्यांचा होकार म्हणजे काम पूर्ण होण्याची हमी. (Aditya Thackeray Modern heir of Shiv Sena and Thackeray family )

ठाकरे घराण्याचे सर्वात जवळचे मंत्री असलेल्या अनिल परब यांच्या वादग्रस्त घराची चौकशी करायला केंद्राचे पथक आलेय हे पत्रकारांनी लक्षात आणून देताच या प्रकरणाची मला माहिती नाही असे राजकीय उत्तर देण्यापर्यंतची मजल आदित्य यांनी सत्तेच्या दोन वर्षातच गाठली आहे. मुंबईच्या रस्त्यांची पहाणी करण्यासाठी श्रीनिवासन यांना मुंबई क्षेत्र प्राधिकरणाचे प्रमुख करणे, आशुतोष सलील या तरुण आयएएस अधिकाऱ्याला महत्व देणे, पर्यटनासाठी आराखडे आखणे अन् तरुण पिढीप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचा ध्यास ठेवणे हे त्यांचे बहुचर्चित गुण. त्यांचे लहान भाऊ तेजस प्राण्यात रमतात, जंगलात जातात अन् वेगळेच आहेत. त्यामुळे सध्यातरी ठाकरे घराण्याचे वारस आहेत ते आदित्य.

हेही वाचा : शिवबांच्या आणि आंबेडकरांच्या नावाने संभाजीराजेंची नक्षलवाद्यांना साद

निवडणूक लढणारे पहिले ठाकरे

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे हे ज्येष्ठ चिरंजीव त्यांच्यासारखेच सभ्य. बोलायला अदबशीर, वागण्याला मर्यादशील. त्यांच्या वडिलांचे शिवसेनेतले स्थान स्थिरस्थावर व्हायच्या आधीच आजोबा बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात युवासेनेचे प्रमुखपद त्याला बहाल केले, शिवाजी पार्कात तलवार सोपवली अन् माझ्या आदित्यला सांभाळून घ्या अशी गळही घातली. त्यानंतरचे आदित्य यांचे जीवन धकाधकीतच गेलेय. निवडणुकीच्या मैदानात उतरलेले पहिले ठाकरे ते हिंदुत्वाची साथ सोडून विचारप्रणालीपासून सेनेला दूर नेणारे पुत्रपर्यंतच्या लंबकात त्यांच्याबद्दल बोलले जाते. ठाकरे असण्याचे फायदे असतात त्याप्रमाणे तोटेही सहन करावे लागतातच की!

राजकारणापासून फुटबॅालपर्यंत...

आदित्य जसे वडिलांचे पुत्र तसेच आईचे चिरंजीव. डोंबिवलीच्या पाटणकर कुटुंबातल्या रश्मीवहिनी संगोपनाबद्दल अत्यंत दक्ष. मुले काय करतात, कुठे जातात येथपासून त्या अत्यंत सजगपणे आईचे कर्तव्य निभावत असतात. मराठीचा पुरस्कार करणाऱ्या प्रत्येकाची पुढची पिढी इंग्रजी शाळेत गेली तसेच आदित्यही बॉम्बे स्कॉटिश या उच्चभ्रूंच्या शाळेत शिकले. त्यानंतर झेव्हियर्स महाविद्यालयात दाखल झाले. हे महाविद्यालय बड्यांचे पण हुषारीला महत्व देणारे. तेथे प्राचार्य असलेल्या फादरशी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत वाद झाला तेंव्हा संबंधित पुस्तक मागे घ्यायचे का यावर आदित्य दोन्ही बाजुंचा विचार करीत खल घालत. याच सुमारास त्यांच्या कवितांच्या पुस्तकाचे अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विमोचन झाले अन् ते राजकारणापाठोपाठ मुंबईतल्या सेलिब्रिटीजच्या मंचावर अवतरले. फुटबॉल हे त्यांचे पॅशन. त्यामुळे मुंबईतल्या फुटबॉल क्लबमध्ये त्यांची उठबस. 

नव्या पिढीचा शिलेदार

मराठमोळ्या पक्षाचा हा आधुनिक वर्तुळात वावरणारा वारस. उद्धवजींच्या खांद्याला खांदा लावून वावरू लागल्याने २०१४ च्या भाजपशी सुरु असलेल्या जागावाटप चर्चेत त्यांनाही शिष्टमंडळाचा भाग करायचे ठरले अन् फिस्कटण्याला वेग आला. बालहट्ट, बालआदित्य अशी चर्चा झडू लागली. आदित्यचे स्वत:चे वर्तुळ हळुहळू सक्रीय होवू लागले. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आलेली किंवा नेमली गेलेली मंडळी या वर्तुळातले प्रमुख चेहरे. सूरज चव्हाण, अमेय घोले, पुण्य परीख, राहुल कनाल हे आदित्य यांचे विश्वासू वर्तुळ. वरूण सरदेसाई हा मावसभाऊ तर सर्वात जवळचा. अमोल किर्तीकरसारखी सेनेशी पिढीजात संबंध असलेल्या एखाद्या अपवादाव्यतिरिक्त हे वर्तुळ सर्वस्वी नवे. 

जुन्या शिवसैनिकांना ते आवडत नसतानाच फडणवीस सरकारमधल्या भाजपच्या हुषार नेत्यांनी काळाची पावले ओळखत आदित्यने उपमुख्यमंत्री व्हावे असा आग्रह सुरु केला. त्या आग्रहाला आदित्य बळी पडले नाहीत पण वरळीत विधानसभा निवडणूक लढायच्या तयारीला लागले. सचिन अहिर या बाहेरच्या माणसाला त्यासाठी आत आणले. इंग्रजी माध्यमांशी जवळीक वाढवली. तरुणाईला नाईट लाईफची आवड आहे असे सांगत नियम बदलण्याच्या आग्रही मागण्या सुरु केल्या. दिनो मोरियाला हाताशी धरून ओपन जिम उभारली गेली. 

काँग्रेस-राष्ट्रवादीत लोकप्रिय

निवडणुकीची वेळ आली तेंव्हा वरळीत गुजराती फलक लावले, मराठी वस्ती आणि पेज थ्री निवास या दोहोत समन्वय साधायचा प्रयत्न झाला. आदित्य जिंकले. ते आमदार झाले अन् भाजपेतर आघाडीचे सरकार झाले त्यात मुख्यमंत्री झालेल्या वडिलांना मदत करायला ते मंत्रीही झाले. हे सेनेतल्या जुन्या खोडांना किती आवडलेय ते माहित नाही पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये आदित्य प्रचंड लोकप्रिय आहेत. सुशांतसिंग प्रकरणाशी त्यांचा संबंध दाखवण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा सेनेची मंडळी अस्वस्थ होती अन् महाविकास आघाडीतील अन्य मंडळी हलकेच अदमास घेत होती. त्यांच्याशी या प्रकरणाचा संबंध जोडणाऱ्या अर्णव गोस्वामीसारख्या पत्रकारावर मुंबई पोलिसांच्या मदतीने कारवाई झाली तेंव्हा संपूर्ण राजकीय वर्तुळाचा श्वास रोखला गेला होता.

जोडीदार म्हणून कुणाची निवड?

बांद्रयाच्या कॉफी शॉप्समध्ये संध्याकाळ घालवणे पसंत करणारे आदित्य सिनेमातल्या नटनट्यांचे मित्र आहेत. ते मुख्यमंत्री होणार की या पुत्रोदयामुळे सेनेला किंमत चुकवावी लागणार हा प्रश्न महत्वाचा आहे. पण त्यापेक्षाही महत्वाचा विषय आहे तो आदित्य पत्नी म्हणून कुणाला निवडतात तो. त्यांची आई उध्दव ठाकरें मागची प्रेरणा आहेत, शक्ती आहेत. ठाकरेंच्या पुढच्या पिढीत आदित्य ही जागा कुणाला बहाल करणार यावर बरंच काही अवलंबून असेल का?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख