मुंबई : मुंबईतील नागरिकांना घरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरातच जा-ये करण्याचा आदेश काढून नंतर तो मागे घेणारे मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांच्या बदलीची चर्चा आता सुरु झाली आहे. दहा पोलिस उपायुक्तांच्या बदल्या करुन अवघ्या तीन दिवसांत त्या मागे घेण्यावरुन टिकाटिप्पणी सुरु असतानाच आता ही नवी चर्चा सुरु झाली आहे.
पोलिस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष नाराज असल्याचे समजते. दोन किलोमीटर अंतरात नागरिकांना जा-ये करण्याची मुभा देण्याचा आदेश काढून तो नंतर मागे घेणे, हे पोलिस आयुक्तांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या निर्णयाच्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सेना-राष्ट्रवादीचे नेते नाराज आहेत.
पोलिस उपायुक्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे प्रकरणही परमवीरसिंह यांच्यावर शेकण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बदल्यांची तसेच नव्या नियमांची माहिती मुख्यमंत्री कार्यालय व गृहमंत्र्यांचे कार्यालय यांना देण्याची आवश्यकता होती. मात्र, ते पाळले गेलेले नाही. दहा पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या मुख्यमंत्र्यांनी काल रद्द केल्या. त्यानंतर पोलिस आयुक्त परमवीरसिंह काल सायंकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर गेले होते. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. आयुक्त लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही भेट घेणार असल्याचे समजते आहे.
मुंबई पोलिस दलातील दहा पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाने रविवारी (ता. 5 जुलै) अचानक रद्द केल्या आहेत. याबाबतचा आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. पण, या बदल्या मुख्यमंत्री कार्यालयाने गृहमंत्र्यांना विश्वासात न घेता केल्या होत्या का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमधील विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. देशात कोरोनाचे संकट गडद असतानाच, या वर्षी पोलिस दलाच्या कोणत्याही प्रकारच्या बदल्या करण्यात येणार नसल्याचे सरकारने कळविले होते.
त्यातच या दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, तर दोन उपायुक्त प्रतिनियुक्तीवर दिल्लीत गेले आहेत. बदली आदेशातनंतर काही अधिकाऱ्यांनी ननीन ठिकाणी पदभारदेखील स्वीकारला होता. तर काही अधिकारी नाराज असल्याने त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. या बदल्यांबाबत मुख्यमंत्री कार्यालय व गृह विभागाला विश्वसात घेतले गेले नसल्यामुळे त्या रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर काल (रविवारी) या बदल्या अचानक रद्द करीत सर्व पोलिस उपायुक्तांना पूर्वीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

