भाजप नेते आज शिवतीर्थावर येणार का? - Will BJP Leader pay tribute to Balasaheb Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नेते आज शिवतीर्थावर येणार का?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

मागच्या वर्षी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या नेत्यांनीही स्व. बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मात्र या वेळी सत्तेतली समीकरणे बदलल्याने भाजपचे नेते  उपस्थित राहतील का? अशी कुजबुज शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली देण्यासाठी आजच्या दिवशी दरवर्षी अनेक शिवसैनिक शिवतीर्थावर येतात. अनेक राजकीय पक्षांचे नेतेही आवर्जून येतात. मागच्या वर्षी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या नेत्यांनीही स्व. बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मात्र या वेळी सत्तेतली समीकरणे बदलल्याने भाजपचे नेते  उपस्थित राहतील का? अशी कुजबुज शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे. आज शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी अनेक शिवसैनिक जातात. शिवाय मोठी फुलांची रांगोळी देखील काढली जाते, मात्र,  यंदा कोरोना परिस्थितीमुळे लहान रांगोळी काढत 'साहेब परत या' अशी हाक लिहून आदरांजली वाहण्यात आली आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय शिवसेनेन घेतला आहे. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि परिवार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत.शिवसैनिकांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जमू नये, असा आदेश शिवसेनेने दिला आहे. मात्र, राज्यातले भाजपचे महत्त्वाचे नेते बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी येतात का, याची उत्सुकता आहे.

दरम्यान, काल शिवसेना भवनात अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुंबईतील विभाग प्रमुखांना हा आदेश देण्यात आला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन उद्या (मंगळवार) आहे. यावेळी कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही. 

 राज्यातली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विभागातील शिवसैनिक, विभागप्रमुख यांनी शिवाजी पार्क इथल्या स्मृतिस्थळी ठिकाणी जमू नये असा आदेश देण्यात आला आहे.  दरम्यान, दिवाळीत खरेदीसाठी वाढलेली गर्दी आणि कोरोनाची वाढलेली रूग्णसंख्या विचारात घेऊन आगामी हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख