बाळासाहेब थोरात होणार उपमुख्यमंत्री? - Will Balasaheb Thorat Get Deputy CM post in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

बाळासाहेब थोरात होणार उपमुख्यमंत्री?

मृणालिनी नानिवडेकर 
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम मानली जाणारी काँग्रेसची शक्ती प्रखर करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती आम्हाला सोपवा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे समजते.

मुंबई :  विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यास रिक्त होणारे पद शिवसेनेकडे सोपवण्याची तयारी काँग्रेसने दाखविल्याचे समजते. महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम मानली जाणारी काँग्रेसची शक्ती प्रखर करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती आम्हाला सोपवा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे समजते.

नव्या प्रस्तावानुसार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नवे उपमुख्यमंत्री होऊ शकतील. विधानसभा अध्यक्षांसारखे महत्त्वाचे पद मिळणार असल्याने शिवसेना या प्रस्तावाला अनुकूल असल्याचे समजते. मात्र कोणताही विशेष अधिकार नसलेले उपमुख्यमंत्रिपद स्वीकारून अध्यक्षासारख्या महत्त्वाच्या पदावर तुळशीपत्र ठेवण्यास काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांचा विरोध आहे.

कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही आमदारांच्या पळवा पळवीचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केल्यास पक्षांतरबंदीचे सर्व कायदे राबवणारे अध्यक्षपद शिवसेनेकडे स्वत:हून सोपवणे योग्य नसल्याचे काँग्रेसमधील काही ज्येष्ठांचे मत आहे. शिवसेनेने मात्र या प्रस्तावावर चर्चा करायला हरकत नाही, अशी सावध भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने अध्यक्षपद आमच्याकडे येत असेल, तर ते चांगलेच नाही का, अशी टिपणी जोडत याबद्दल तशी वेळ आल्यास महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीत चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

तीन नावांची चर्चा
नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्तीशी संबंधित काही मुद्द्यांमध्ये अध्यक्षपद हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने मान्य केले. विद्यमान अध्यक्षांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण, के. सी. पडवी, यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे. अध्यक्षपद सोडायचे नाही, असे ठरल्यास अशोक चव्हाण किंवा नितीन राऊत यांच्याशी पटोलेंच्या जबाबदारीची आदलाबदल होऊ शकते. पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळेन पण, मंत्रिपद हवे असल्याची अट घातल्याचेही बोलले जाते. त्यामुळे हा पदबदलाचा प्रस्ताव चर्चेत आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख