Why Eknath Shinde Milind Narvekar Met Maharashtra Governor | Sarkarnama

कशासाठी बोलावले होते राज्यपालांनी एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकरांना?

मृणालिनी नानिवडेकर
गुरुवार, 25 जून 2020

राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर नेमावयाच्या संभाव्य नावांची चर्चा सुरु असतानाच राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) व शिवसेनेचे सचीव मिलिंद नार्वेकर यांना राजभवनावर बोलावून घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई : राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर नेमावयाच्या संभाव्य नावांची चर्चा सुरु असतानाच राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) व शिवसेनेचे सचीव मिलिंद नार्वेकर यांना राजभवनावर बोलावून घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांसाठी सत्ताधारी तिन्ही पक्षांमध्ये विविध नावांची चर्चा सुरु आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून कला, क्रीडा, साहित्य आदी विषयांमध्ये तज्ज्ञ असलेल्या मंडळींना घ्यावे, असा संकेत आहे. मात्र, अनेकदा राजकीय नेत्यांचीच त्यावर वर्णी लागते.

राज्यपाल यावेळी अशा नियुक्त्या करताना नियुक्तीच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. अशी पार्श्वभूमी असल्याने निकषांव्यतिरिक्तची नावे पाठवायची नाहीत, असे ठरल्याचे वृत्त 'सरकारनामा'ने दिले होते. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय पेच निर्माण न करता, नावे न पाठवण्याबाबत राज्यपालांशी चर्चा झाल्याचे समजते. 

परिक्षा रद्द करण्याबाबत आधीच सरकार व राज्यपाल यांच्यात मतभेद आहेत. त्यात हा नवीन वाद नको या दृष्टीने शिंदे व नार्वेकर यांच्या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कलावंतांच्या प्रश्नावर भेट घेतली होती. ही भेट कलावंतांचे प्रश्न मांडणारी होती. मात्र, या भेटीनंतर आनंद शिंदे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपालनियुक्त आमदारपदी संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनाही राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून संधी देण्याची तयारी करत आहे. अन्य पक्षातही अनेक जण राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक आहेत. मात्र, आता राज्यपाल काय भूमीका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख