मग राठोडांना वेगळा न्याय का? सेना नेत्यांच्या चर्चेचा रोख - Who will take decision about Anil Deshmukh Sharad Pawar or Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मग राठोडांना वेगळा न्याय का? सेना नेत्यांच्या चर्चेचा रोख

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 मार्च 2021

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्येष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरु केली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा काय, यावर मात्र कोणताही निर्णय काल होवू शकला नाही.

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे त्यांच्यावरील आरोपांतून सुटले. राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई केली नाही. आताही परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र पाठवले आहे. पण अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिकता दिसत नाही. त्यामुळे राठोड यांना जो न्याय लावला तो इतर नेत्यांबाबत का नाही, असा शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांचा खासगीतल्या चर्चेतला रोख असल्याचे समजते. (Who will take decision about Anil Deshmukh Sharad Pawar or Uddhav Thackeray)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त (Mumbai Police) आणि ज्येष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरु केली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा काय, यावर मात्र कोणताही निर्णय काल होवू शकला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर सोपवला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कल लक्षात घेवून पुढे काय, ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निश्चित करणार असे समजते.

घटक पक्षांनी त्यांच्या सदस्यांबद्दलची भूमिका ठरवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करणे उचित ठरेल, असे शिवसेनेतील एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. परमबीरसिंग (Parambir Singh) यांच्या पत्राने शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काहीसा तणाव निर्माण झाल्याचे चित्र होते.  मात्र, संशयाच्या घेऱ्यात सापडलेल्या सरकारवरचे आरोप दूर करणे ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्राथमिकता असावी, अशी अपेक्षाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे  व्यक्त केली जाते आहे. देशमुखांना राजीनामा देण्यास सांगितले तर पुढचे गृहमंत्री कोण हा प्रश्नही सेनेसमोर आहे.महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा उज्ज्वल राखणे ही उध्दव यांच्या  प्राधान्यक्रमातील सर्वात महत्वाची बाब असल्याचे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले.

शासकीय सेवेत असलेल्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याने काही बेलगाम वक्तव्ये केली तर त्याला 'कारणे दाखवा' अशी नोटिस देत शिस्तभंगाची कारवाई केली जाते. परमबीरसिंग यांचे भाजप नेत्यांशी कौटुंबिक नाते असून त्यांनी लिहिलेले पत्र हे विशिष्ट हेतूने लिहिले आहे, असे महाविकास आघाडीतील काहींचे मत आहे. त्यांच्यावर कारवाई होईल हे लक्षात आल्यानंतर ‍१७ मार्चला त्यांनी सहकाऱ्यांशी संवाद साधला होता हे पत्रावरून दिसते आहे. (Who will take decision about Anil Deshmukh Sharad Pawar or Uddhav Thackeray)

कारवाई टाळण्यासाठी त्यांनी तयारी केली  होती असे सरकारचे मत झाले आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या सेवाशर्तीनुसार परमबीर यांच्यावरील कारवाई ही महाराष्ट्र सरकारला करावी लागेल. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांशी या संदर्भात संवाद झाला आहे. रिबेरो यांच्याप्रमाणेच निवृत्त अधिकाऱ्यांनी या वादात आपल्याला कोणतीही भूमिका बजावायची नाही, असे सांगितले आहे. अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराची प्रकरणे राजकीय नेतृत्वाच्या कानावर घातल्याचे लिहिले असल्याने आता मंत्र्यांना जबाबदार धरले गेले नाही, तर ते योग्य ठरेल काय, असा विचारही काही मंत्र्यांनी बोलून दाखवला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख