संजय राऊत म्हणतात, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत! - We are certified goons says Shiv Sena Leader Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

संजय राऊत म्हणतात, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 जून 2021

शिवसेना भवनासमोर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी मोठा राडा झाला.

मुंबई : राम मंदिर (Ram Temple) जमिनीसाठी झालेल्या कथित गैरव्यवहरावरून `सामना`ने टीका केल्याने बुधवारी भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी गेले. मात्र तेथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. त्यावर बोलताना त्यानंतर भाजपने (BJP) शिवसेनेवर गुंडगिरी व सत्तेचा माज असल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी होय आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असे वक्तव्य केलं आहे. (We are certified goons says Shiv Sena Leader Sanjay Raut) 

शिवसेना भवनासमोर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी मोठा राडा झाला. याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना गुंडगिरी करते, होय करते. सत्तेचा माज मात्र चुकीचे आहे. काल जर सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता तर वेगळा प्रकार घडला असता. गुंडगिरीचे म्हणाल तर शिवसैनिक व शिवसेना भवनावर कुणी चाल करून येत असेल तर होय आम्ही गुंड आहोत.

हेही वाचा : अण्णाद्रमुकचे नेते बालिश! शशिकलांची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल

आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राची अस्मिता व हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने त्यावेळी केंद्राविरोधात केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. ही गुंडगिरी आम्ही करत राहिलो म्हणून आज महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज आहे, असे राऊत म्हणाले. 

शिवसेना भवनासमोर काय घडले?

राम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे  मुखपत्र ‘सामना’मध्ये  (Shivsena mouthpiece Saamna) बोट ठेवण्यात आल्याने आज भाजपच्या मुंबई युवा मोर्चाचे कार्यकर्ते दादर येथील शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी पोहोचले. या आंदोलनाची कुणकुण लागताच शिवसेनेचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने बाचाबाचीला सुरुवात होऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : वाहनचालकांना मोठा दिलासा; कागदपत्रांची मुदत संपली काळजी करू नका

भाजपच्या युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजेंदर तिवाना यांच्यासह कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने फटकार मोर्चासाठी शिवसेना भवनसमोर जमले होते. शिवसेनेविरोधात घोषणा देत असतानाच तेथे शिवसेनेचे आमदार सदा सरणवकर, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह कार्यकर्तेही मोठ्या संख्येने पोहोचले. घोषणाबाजी सुरू असतानाच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. धक्काबुक्की, हाणामारीमुळे या परिसरातील वातावरण तंग झाले होते.

पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. शिवसेना भवनासमोर हा प्रकार सुरू असताना परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले होते. संध्याकाळनंतर या परिसरातील गर्दी कमी झाली असली, तरी वातावरण तंग होते. तसेच या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख