Vrajlap will be applied on the idol of Vitthal Rukmini from tomorrow ..! | Sarkarnama

विठ्ठल रुक्‍मिणी मूर्तीवर उद्यापासून व्रजलेप !

भारत नागणे
सोमवार, 22 जून 2020

गेल्या आठ वर्षानंतर चौथ्यांदा व्रजलेप केला जात आहे. दोन दिवसात ही व्रजलेपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 

सोलापूर : अखिल वारकरी विश्वाचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्‍मिणी मूर्तीवर व्रजलेप ( रासायनिकलेप) करण्यास मुहूर्त मिळाला आहे. पुरातत्व विभागाच्या मान्यतेनंतर उद्यापासून (ता.23) ही रासायनिक लेप प्रक्रिया देवाच्या मूर्तीवर केली जाणार आहे. 

गेल्या आठ वर्षानंतर चौथ्यांदा व्रजलेप केला जात आहे. दोन दिवसात ही व्रजलेपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 

भाविकांना स्पर्श दर्शन घेता येते. त्यामुळे देवाच्या पायाची झीज झाली आहे. देवाच्या या मूर्तीचे संवर्धन व्हावे यासाठी व्रजलेप केला जाणार आहे. या पूर्वीमूर्ती संवर्धनासाठी पुरातत्व विभागाच्या मान्यतेनुसार 19 98, 2005 आणि 2012 असे तीन वेळा देवाच्या दोन्ही मूर्तीवर व्रजलेप कऱण्यात आला होता. 

अलीकडेच पुरातत्व विभागाने मंदिर आणि देवाच्या मूर्तीची पाहाणी केली होती. त्यानंतर मूर्तीवर व्रजलेप कऱणे आवश्‍यक असल्याचा अहवाल पुरातत्व विभागाने मंदिर समितीला दिला होता. त्यानंतर विठ्ठल मंदिर समितीने व्रजलेप कऱण्यासाठी विधि व न्याय खात्याकडे परवानगी मागितली होती. 4 जून रोजी विधी व न्याय खात्याने व्रजलेप करण्यास मान्यता दिली आहे. 

त्यानुसार मंदिर समितीच्या बैठकीमध्ये मूर्ती संवर्धनसाठी व्रजलेप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. सध्या कोरोनामुळे विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे.

अशा बंद काळात व्रजलेप कऱणे सोयीचे होईल म्हणून, 23 व 24 जून या दोन दिवशी विठ्ठल आणि रुक्‍मिणी मातेच्या मूर्तीवर व्रजलेप प्रक्रिया केली जाणार आहे,अशी माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख