मुंबई : टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात घेण्यात येत असलेले नांव आणि त्यानंतर अज्ञातवासात राहून नंतर पोहरादेवी येथे केलेले शक्तीप्रदर्शन यामुळे वन राज्यमंत्री संजय राठोड चांगलेच अडचणीत आले आहेत. आता त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विदर्भातल्या शिवसैनिकांनी एकजूट करायला सुरुवात केली आहे.
८ फेब्रुवारी रोजी पूजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने तिचा मृत्य झाला. महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील फ्लॅटमध्ये पूजा तिचा भाऊ आणि भावाचा मित्र यांच्यासोबत राहत होती. या प्रकरणामध्ये वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणाशी संबंधित काही अॉडिओ क्लिप समोर आल्या असून त्यातील आवाज राठोड यांचाच असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे.
हे देखिल वाचा -
मी निर्णय घेण्याआधी तू घे...मुख्यमंत्र्यांनी राठोडांना सुनावले
राठोडांना मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत...
या प्रकरणात सुरुवातीला राठोड यांना सहानुभूती दाखवली जात होती. आपल्याला या प्रकरणात गुंतवण्यात येत असल्याचा दावा राठोड यांनी केला होता. मात्र, पोहोरादेवी येथे त्यांनी ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन केले, तो एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रकार होता, अशी चर्चा सुरु झाली. त्यानंतर शिवसेनेतही अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वकीयांचाच दबाव वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भातले शिवसैनिक घेणार उद्धव ठाकरेंची भेट
मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा राजीनामा घ्यावा, यासाठी आता विदर्भातील शिवसैनिकांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विदर्भातले शिवसेनेचे लोकप्रतिनिधी या प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राठोडांमुळे विदर्भात पक्षाचे काम करणे कठीण होत असल्याची या लोकप्रतिनिधींची भावना असून ती हे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. एका बाजूला राठोडांनी राजीनामा द्यावा, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून दबाव आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार खासदारही पक्षावर दबाव आणण्याची शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळाची स्थापना झाली. त्यावेळीही काही आमदार, खासदार तसेच जिल्हा प्रमुखांनी राठोड यांच्या नियुक्तीला विरोध केला आहे. येत्या १ मार्चपासून अधिवेशन सुरु होत आहे. राठोड प्रकरणामुळे अधिवेशनात गदारोळ होणार हे निश्चित आहे. त्या पार्श्वभूमीवर विदर्भातले शिवसेना नेते व लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुन्हा राठोड यांच्या विरोधात पत्र देण्याची शक्यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

