मोदी सरकारची पोलखोल : राज्यात केवळ साडेसात लाख डोस शिल्लक, तीन दिवसांत एकही लस मिळणार नाही - Vaccine shortage in maharashtra amid surge in corona cases | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी सरकारची पोलखोल : राज्यात केवळ साडेसात लाख डोस शिल्लक, तीन दिवसांत एकही लस मिळणार नाही

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण तुलनेने सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 0.22 टक्के एवढेच आहे.

मुंबई : महाराष्ट्राला मुबलक प्रमाणात लशींचा पुरवठा करत असल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारची त्यांच्याच अहवालाने पोलखोल झाली आहे. आज सकाळपर्यंत महाराष्ट्रात लशीचे केवळ साडेसात लाख डोस शिल्लक असल्याचे या अहवालात म्हटलं आहे. तसेच पुढील तीन दिवसांत महाराष्ट्राला एकही लस मिळणार नसल्याचे या अहवालातच नमुद करण्यात आले आहे. त्यातच आता 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण करावे लागणार आहे. त्यामुळं राज्यात लसीकरणाचे उद्दिष्ट कसे साध्य होणार हा प्रश्नच आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज देशातील सर्व राज्यांना पुरविण्यात आलेल्या लशी व शिल्लक साठ्याची माहिती प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 1 कोटी 63 लाख डोस महाराष्ट्राला मिळाले आहेत. त्यानुसार देशात सर्वाधिक 1 कोटी 56 लाख डोस महाराष्ट्रात देण्यात आले आहेत. राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण तुलनेने सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 0.22 टक्के एवढेच आहे. त्यानुसार आज सकाळी आठ वाजेपर्यंत महाराष्ट्रात केवळ 7 लाख 49 हजार 960 एवढ्याच लशी शिल्लक असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. 

पुढील तीन दिवसांत महाराष्ट्राला एकही लस नाही

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दीन दिवसांत देशांतील विविध राज्यांना 20 लाख 48 हजार 890 लशींचे वाटप केले जाणार आहे. पण त्यामध्ये सर्वाधिक 3 लाख 48 हजार डोस उत्तर प्रदेशसाठी तर प्रत्येकी तीन लाख डोस गुजरात, तमिळनाडू आणि तेलंगणासाठी आहेत. गोवा, केरळ आणि मिझोरामसाठी प्रत्येकी एक लाख, हिमाचल प्रदेश व आसामला प्रत्येकी दीड लाख, छत्तीसगढसाठी दोन लाख लशींचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्राच्या नावापुढे एकही लस नसल्याचे दिसून येते. 

राज्याचे उद्दिष्ट आठ लाखांचे

राज्यात कालपर्यंत कालपर्यंत 1 कोटी 55 लाख 94 हजार 640 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. काल 2 लाख 37 हजार 700 जणांना लस देण्यात आली. 27 तारखेला हा आकडा 3 लाख 88 हजार तर 26 तारखेला 5 लाख 34 हजार या विक्रमी लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. राज्याने दररोज ८ लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. 

कसे होणार लसीकरण?

सध्या लशींचा पुरवठा कमी होत असल्याने पुण्या-मुंबईसह अनेक शहरांतील लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. राज्यात केवळ एक-दोन दिवस पुरेल एवढा लशींचा साठी शिल्लक असतो. हा साठाही जिल्हानिहाय विभागलेला असल्याने प्रत्येक शहरांतील लसीकरणाचे प्रमाण दररोज कमी-अधिक होते. त्यामुळे काही शहरांमध्ये तुटवडा निर्माण होत आहे.

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणाची मोहिम सुरू केली जाणार आहे. त्यांच्या लसीकरणासाठी सुमारे १२ कोटी डोसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. केंद्र सरकारकडून केवळ 45 वर्षांपुढील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यासाठी केंद्रांकडून लशींचा पुरवठा केला जाणार आहे. पण इतरांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारला लशी मिळवाव्या लागणार आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख