नारायण राणेंच्या म्हणण्याला शिवसेना काडीचीही किंमत देत नाही  - Transport Minister Anil Parab criticizes Narayan Rane | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणेंच्या म्हणण्याला शिवसेना काडीचीही किंमत देत नाही 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

त्यांना अपेक्षित होतं, तसं काहीही झालेलं नाही, त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांचा विरोध आम्हालाही अपेक्षित आहे. 

मुंबई : "नारायण राणे यांच्याकडून सर्टिफिकेट घेण्याएवढे वाईट दिवस आमच्यावर (शिवसेनेवर) आलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही,' असा टोला शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी राणे यांना लगावला. 

राज्यातील ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. मात्र, जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. ठाकरे सरकारचे काम शून्य आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केली होती. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना परब यांनी राणेंवर टीका केली. 

ते म्हणाले की, सरकार हे सरकार म्हणून काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारने वर्षभर केलेल्या कामाचा इतिवृत्तांत आपल्यासमोर आहे. विरोधकांचे काम हे विरोध करण्याचेच असून ते विरोध करतच राहणार. कारण, त्यांना अपेक्षित होतं, तसं काहीही झालेलं नाही, त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांचा विरोध आम्हालाही अपेक्षित आहे. 

शेतकरी, कामगारांना न्याय देण्यात सरकार कमी पडत आहे, तसेच कायदा सुव्यवस्थाही बिडल्याचा आरोप होत आहे, याबाबत अनिल परब यांनी सांगितले की, "ज्यांना महाराष्ट्र कळतो, त्यांच्यापुढे सरकारचे काम एकदा ठेवा. सत्तेवर येताच राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफी संपता संपातच कोरोनाचे संकट आले. या संकटात केवळ आपल्या देशाचीच नव्हे, तर संपूर्ण जगाचीच दैना झाली. त्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाले. अशा वेळेला कर्ज काढावेच लागते. मागच्या सरकारांचाही इतिहास बघा, अशा संकटाच्या वेळी तत्कालीन सरकारने कर्ज काढले आहे. कर्ज काढण्यासाठी पत असावी लागते आणि महाराष्ट्राची पत आहे, त्यामुळे कर्ज काढून का होईना राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करत आहे.' 

"विरोधी पक्ष हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर जहरी टिका करणारच. कारण, त्यांना दुसरे कोणतेही काम आता उरलेले नाही. आम्ही (सरकार) आमचं काम करत राहणार, जनतेचे प्रश्‍न सोडवत राहणार. कोरोनाच्या महामारीवर सरकार काम करत आहे. लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ते सरकारला कितीही विरोध करत राहिले तरी पाच वर्षे विरोध करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणतेही काम नाही,' असा टोला त्यांनी भाजपला लगावला. 

कॉंग्रेस आघाडीच्या सरकारपेक्षाही हे सध्याचे सरकार अकार्यक्षम आहे, असा आरोप भाजपकडून केला जात आहे, त्याबद्दल परब म्हणाले, "पुढची पाच वर्षे त्यांना सरकारला विरोध करत राहणे हे एकच काम आहे आणि पाच वर्षे लोकांची काम करणं, हे आमचं काम आहे.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख