रिपब्लिकनचे ३ हजार सदस्य निवडून आल्याचा आठवलेंचा दावा - Three Thousand RPI Workers elected In Grampanchayat Elections Claims Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

रिपब्लिकनचे ३ हजार सदस्य निवडून आल्याचा आठवलेंचा दावा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

राज्यात भजप आणि आरपीआयला ग्राम पंचायत निवडणुकीत बहुमत लाभले असून राज्यात भाजपवरच  जनमानसांचा विश्वास असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे असा दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी  केला

मुंबई : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी केली असून २ हजार ९६० पेक्षा अधिक सदस्य रिपाइं चे  निवडून आले आहेत. राज्यात भजप आणि आरपीआयला ग्राम पंचायत निवडणुकीत बहुमत लाभले असून राज्यात भाजपवरच  जनमानसांचा विश्वास असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे असा दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी  केला. निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी निवडणुकीत झालेले वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करावे असे आवाहन  आठवले यांनी केले आहे.

राज्यात १२ हजार ७११ ग्राम पंचायती च्या झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा अंदाजे  ६० ग्राम पंचायतीवर निळा झेंडा फडकला असून संपूर्ण राज्यात ग्राम पंचायत निवडणुकीत  ३ हजार  सदस्य रिपब्लिकन पक्षाचे निवडून आले आहेत. अशी माहिती  रिपाइं चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर निवडणुका लढविल्या असून येथील अक्कलकोट तालुक्यातील गावात रिपाइं ने भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आशा सर्व पक्षांना दणका देत स्वबळावर सर्व उमेदवार निवडून आणून ग्राम पंचायतीवर निळा झेंडा फडकविला असल्याची माहिती राजभाऊ सरवदे यांनी दिली आहे. 

ग्रामीण भागात रिपब्लिकन पक्षाची जनतेशी नाळ घट्ट आहे. अनेक ठिकाणी स्वबळावर तर राज्यभरात बहुतांश ठिकाणी भाजप शी युती करून रिपाइं ने ग्राम पंचायत निवडणूक लढविली आहे. त्यात रिपाइं चे ३ हजार हुन अधिक निवडून आल्याचा दावा आठवले यांनी केला  आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख