ठाकरे सरकार पाच वर्षे टिकणारच, थोरातांचे राज ठाकरेंना उत्तर - Thackeray government will last for five years, Thorat's reply to Raj Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकार पाच वर्षे टिकणारच, थोरातांचे राज ठाकरेंना उत्तर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार थोरात यांनी घेतला आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे राज ठाकरे म्हणतात.मात्र ते कशाच्या आधारे ही भविष्यवाणी करतात,असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. 

एकीकडे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ही ठाकरे सरकारवर टीका करीत असतात. आपआपसातील मतभेदामुळे हे सरकार कोसळेल असे ते सांगत आहेत. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेविषयी आशावादी आहेत. मात्र जे फडणवीस सांगत आहेत ते आता राज ठाकरेही सांगत आहे. हे सरकारच टीकणार नाही असा त्यांचा दावा आहे. 

राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार थोरात यांनी घेतला आहे. ते म्हणाले, की ठाकरे सरकार आपला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल,असा मला आत्मविश्वास आहे. सरकार जास्त काळ टिकणार नाही. अशी भविष्यवाणी राज ठाकरे हे कशाच्या आधारे करतात, हेच मला समजत नाही. 

या सरकारला म्हणजे आम्हाला फार कमी कालखंड मिळाला आहे. त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आघाडी सरकारचे काम पाहिले तर ते निश्‍चितच चांगले आहे. कामांची यादी पाहिली तर खूप मोठी आहे आणि किमान समान कार्यक्रमदेखील आम्ही राबवत आहोत असे थोरात म्हणाले. 

हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. हे मी आधीच सांगितले होते आणि आताही सांगतोय हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे राज ठाकरे म्हणाले होते. 

धनंजय मुंडे यांना पाठवली नशाबंदीची राखी 

"व्यसनमुक्तीशी बंधन आणि व्यसनापासून रक्षण' हा संदेश देण्यासाठी राज्यातील नशाबंदी मंडळाच्या महिलांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना अनोखी राखी पाठवली आहे. राज्यातील नशाबंदीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी यानिमित्ताने महिलांनी मुंडे यांच्याकडे केली आहे. 

"व्यसनांना हवे लॉकडाऊनचे बंधन, तेव्हाच होईल महिलांचे रक्षण', असे विविध घोषवाक्‍यांनी ही राखी सजवलेली आहे. 

राज्य सरकारने नशाबंदीची मोहीम अधिक प्रभावी करावी. त्यामुळे नशेतून महिलांवर होणारा हिंसाचार टाळता येणार आहे, असे महिलांनी म्हटले आहे. महाराष्ट्र व्यसनमुक्त व्हावा यासाठी व्यसनमुक्त धोरण 2011 ची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. त्या उद्देशानेच सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांना राखी पाठवल्याचे महिलांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख