मुंबई : "राजभवन सचिवालयाने दौऱ्याअगोदर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य सरकारची कुठलीही चूक नाही,'' असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राजभवनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य सरकारला विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते, असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवारी (ता. 10 फेब्रुवारी) मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र, राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपालांना शासकीय विमानाने इच्छितस्थळी जाता आले नाही.
वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत राज्य सरकारने देखील गंभीर दखल घेतली आहे. राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा : राज्यपाल-ठाकरे सरकारमधील संघर्ष पेटला; राज्यपालांना शासकीय विमान नाकारले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे सरकारमधील वाद अनेकदा झाले आहेत. गुरुवारीही राज्यपालांना शासकीय विमान नाकारण्यात आल्याचे समोर आल्याने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचे समजल्यानंतर ते पुन्हा खाली उतरले. अखेर खाजगी विमानाने ते डेहराडूनला रवाना झाले.
ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासूनच राज्यपाल व सरकारमध्ये सातत्याने वाद होत आहेत. राज्यपालांकडून अनेकदा सरकारवर जाहीर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. मागील तीन महिन्यांपासून 12 जणांची नावे राज्यपालांकडे देऊनही अद्याप त्यावर सही झालेली नाही. त्यावरूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच नाराजीही व्यक्त केली. हा वाद थांबताना दिसत नाही.
मसुरी येथे आयएएस प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमासाठी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निघाले होते. नियोजनानुसार त्यांनी आधीपासूनच विमानाची नोंदणी केली होती, असे सांगितले जात आहे. त्यानुसार राज्यपाल विमानात जाऊन बसलेही. जवळपास 20 मिनिटे बसल्यानंतर त्यांच्या विमानाला सरकारची परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना खासगी विमानाने जावे लागले.

