हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता? - State Government Thinking to postpone Winter Session due to Corona spread | Politics Marathi News - Sarkarnama

हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

दिवाळीत खरेदीसाठी वाढलेली गर्दी आणि कोरोनाची वाढलेली रूग्णसंख्या विचारात घेऊन आगामी हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबई : दिवाळीत खरेदीसाठी वाढलेली गर्दी आणि कोरोनाची वाढलेली रूग्णसंख्या विचारात घेऊन आगामी हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

येत्या ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार होते. मात्र, गेल्या काही दिवसांत दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वच शहरांमध्ये बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे ही आकडेवारी लक्षात घेऊन सत्ताधारी पक्षाने हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार सुरु केला आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक होणार आहे.या बैठकीत कोरोना आकडेवारीचा विचार करून आधिवेशन घ्यायचे कि पुढे ढकलायचे याबाबत विचार केला जाणार आहे. 

दरम्यान, "कोरोनाचे कारण देऊन विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न असून हे सरकार हिवाळी अधिवेशनापासून पळ काढत आहे," अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. अधिवेशनाच्या तारखा तसेच ठिकाण याबाबत अजूनही अनिश्चितता असून यासंदर्भात वेगवेगळी विधाने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी ही टीका केली होती.

महाराष्ट्रात उद्योगधंदे बंद पडले आहेत, बेरोजगारीचा विषय वाढत आहे, अन्य कित्येक समस्या आ वासून उभ्या आहेत. अशा या सगळ्या विषयांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील जनता विधीमंडळ अधिवेशनाची वाट पाहत आहे. पण या अधिवेशनापासून पळ काढण्याची भूमिका या सरकारची दिसते आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशाचा कालावधी ठरवू असे सरकार आधी सांगत होते. मात्र हेच सरकार आता अधिवेशनापासून पळ काढण्यासाठी कोरोनाचा आधार घेत हे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे, असे दरेकर म्हणाले होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख