चंद्रकांतदादा यापुढे 'पहाटे'चा मुहूर्त नाही : राऊतांचा 'सामना'तून टोला - Shivsena Reacts on Chandrakant Patil Statements | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादा यापुढे 'पहाटे'चा मुहूर्त नाही : राऊतांचा 'सामना'तून टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

गेल्या शनिवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट झाली. त्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही भेट 'सामना'तील मुलाखतीसाठी होती हे दोन्ही नेत्यांनी सांगितले. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा राजकीय धुरळा उडवून दिला. त्याला 'सामना'च्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आले आहे

पुणे : ''पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात 'पहाट' योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. सरकार दिवसरात्र काम करते व पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत," असे म्हणत शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

गेल्या शनिवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट झाली. त्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही भेट 'सामना'तील मुलाखतीसाठी होती हे दोन्ही नेत्यांनी सांगितले. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा राजकीय धुरळा उडवून दिला. त्याला 'सामना'च्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आले आहे. " राज्याच्या राजकारणात 'वन फाइन मॉर्निंग' अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तविल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वगैरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाइन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत,'' असा चिमटा या अग्रलेखातून काढण्यात आला आहे. 

''चंद्रकांतदादांना फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असे वाटते. हे काही चांगल्या प्रकृतीचे 'साइन' नाही. देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्या अचानक भेटीनंतर जो गदारोळ झाला त्यामुळे एखाद्या फाइन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. एकतर अशा फाइन मॉर्निंगचा अचानक प्रयोग भाजपने याआधी केलाच आहे, पण त्या फाइन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या ७२ तासांत दुरुस्त झाले. याचे भान सध्या फक्त श्री. देवेंद्रबाबूंनाच आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही व हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असे श्री. देवेंद्र फडणवीस सांगत आहेत व त्याचवेळी एखाद्या फाइन मॉर्निंगला 'काहीतरी' घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचे?,'' असा सवाल 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे.

''नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे,'' असाही टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख