मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची आज पाॅवरफूल बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
आज होणाऱ्या या बैठकीत शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित रहाणार आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्या नंतर शिवसेनेची ही पहीलीच पाॅवरफूल बैठक आहे. या बैठकीत राज्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी महत्वाची चर्चा होणार आहे.
नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलंय. आता सरपंच निवडणुक आणि राज्यातील पाच महानगरपालिकांच्या प्रलंबीत निवडणुका होणार आहेत. यासाठी शिवसेनेची रणनिती ही या बैठकीत ठरू शकते.
दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण वनमंत्री संजय राठोड यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसते. ते आपल्या पदाचा लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरील दबाव वाढला आहे. त्यामुळे त्यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.
पूजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने मागील आठवड्यात (ता. ८ फेब्रुवारी) तिचा मृत्य झाला. महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील फ्लॅटमधअये पूजा हि तिचा भाऊ आणि भावाचा मित्र यांच्यासोबत राहत होती. या प्रकरणामध्ये वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणाशी संबंधित काही आॅडिओ क्लिप समोर आल्या असून त्यातील आवाज राठोड यांचाच असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे.
पूजाच्या मृत्यूला राठोडच कारणीभूत असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. अद्याप पोलिस तपासातून काहीच उलगडा झालेला नाही. या प्रकरणावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरील दबावही वाढला आहे. राठोड या पूजाच्या मृत्यूनंतर गायब झाले आहेत. त्यांचा फोनही नॉट रिचेबल आहे. त्यामुळे त्यांच्यावरील संशयाचे सावट गडद झाले आहे. परिणामी, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेवर दबाव वाढला आहे.
Edited By - Amit Golwalkar

